अर्णब गोस्वामींना संवेदनशील माहिती कोणी पुरविली - पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

January 17,2021

मुंबई : १७ जानेवारी - रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचे आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संवाद शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली होती. यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित करत गोस्वामींना संवेदनशील माहिती कोणी पुरवली असा सवाल केला आहे.

चव्हाण यांनी ट्विटद्वारे या प्रकरणावर शंका व्यक्त करताना केंद्र सरकारकडे काही मागण्याही केल्या आहेत. ते म्हणाले, मुंबई पोलिसांनी रिलीज केलेले गोस्वामी यांचे व्हॉट्सअॅप चॅट्स हे खूपच धक्कादायक आहेत. देशाच्या सुरक्षेबाबतची संवेदनशील माहिती, घटना दुरुस्त्या आणि राजकीय नियुक्त्यांबाबतची माहिती त्यांना कोणी पुरवली? असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.

भारत सरकारने याप्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली पाहिजे. त्याचबरोबर संरक्षणविषय संसदीय स्थायी समितीने हे प्रकरण प्राधान्याने आपल्याकडे घ्यावे अशी मागणीनीह पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

काय आहे अर्णब गोस्वामी- दासगुप्ता यांच्यातील संवाद?

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या संवादात पार्थ यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय (यूजलेस) असा केला आहे. त्याचबरोबर समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे उघड झाले आहे. याशिवाय फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे अतिरेक्यांनी घडवलेल्या आत्मघातकी हल्ल्याबाबत अर्णब यांचे आक्षेपार्ह विधान आढळते. या हल्ल्यात ४० केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. या व्हॉट्सअॅप संवादात पुलवामा हल्ल्याबाबत अर्णब यांनी केलेल्या विधानाचा समाचार नागरिकांनी ट्विटरसह अन्य समाजमाध्यमांवरून घेतला. समाजमाध्यमांवर शुक्रवारी याच संवादांबाबत चर्चा होती. मीम्स आणि टीकेचा भडीमार होत होता.