शेतशिवारात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ

January 17,2021

चंद्रपूर : १७ जानेवारी - चंद्रपूर  जिल्ह्यातील घुग्गुस शहरालगत असलेल्या शांतीनगर भागातील शेतशिवारात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विजेचा धक्का  लागून दोघांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदेश तक्कला आणि उमेश्वरी तक्कला अशी मृतांची नाव आहे. संदेश आणि उमेश्वरी हे दोघे शांतीनगर भागात राहत होते.  हे दोघेही शनिवारी रात्रीपासून घरी नव्हते. शहराला लागून असलेल्या शांतीनगरमध्ये एका व्यक्तीच्या शेतामध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले आहे.

विजेचा शॉक लागून या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. जनावरांपासून संरक्षण मिळवण्यासाठी लावण्यात आलेल्या तारेला स्पर्श झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या दोघांचे मृतदेह अन्य व्यक्तीच्या शेतात आढळून आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. या दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.  हा आकस्मिक मृत्यू की घातपात होता, याबद्दल पोलीस तपास करत आहे. दाम्पत्याचा असा करुण अंत झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.