बेळगावात शेतकऱ्यांनी अमित शहांसमोर केले आंदोलन

January 17,2021

कर्नाटक : १७ जानेवारी -  देशाचे गृहमंत्री अमित शहा  याच निमित्ताने कर्नाटकच्या दौऱ्यावर आहे. शेतकरी कायदे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी अमित शहांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सीमाभागातील लढवय्यांनी बलिदान दिलं आणि त्याच हुतात्म्यांना आज अभिवादन केले जात आहे. त्यानिमित्ताने अमित शहा हे बेळगावमध्ये दाखल झाले आहे. त्यांच्या दौऱ्याच्या आधी स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. रस्त्यावर लोटांगण घालत शेतकऱ्यांनी अमित शहांच्या विरोधात आंदोलन केले.

तर बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांच्या वतीने  सीमाभागातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बेळगावच्या दौऱ्यावर येत असल्याने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांना दरवर्षी ज्या मार्गानं रॅली काढली जाते त्या मार्गावर परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे पर्यायी मार्गाने आज ही रॅली काढण्यात आली.

या रॅलीच्या अनुषंगाने बेळगाव शहरात रॅली मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शहा यांची भेट मागितली होती. मात्र, ही भेट शहा यांनी नाकारल्याने सीमाभागात संतापाची लाट आहे.