तुम्ही नियम तोडणाऱ्यांविरोधात कारवाई करा, मी तुमच्या पाठीशी - अनिल देशमुखांची पोलिसांना ग्वाही

January 17,2021

नागपूर :  १७ जानेवारी -  “शहरात गुन्ह्यांचे प्रमाण बरेच आहे. बॉडी वॉर्न कॅमेरा पोलिसांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. पोलिसांशी हुज्जत घालणे, महिलांसोबत छेडछाड करणे, असे अनेक प्रकार रोज घडत असतात. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना पकडण्यासाठी  बॉडी वॉर्न कॅमेऱ्याचा उपयोग करता येऊ शकतो,” असे अनील देशमुख म्हणाले. तसेच गरज पडल्यास शहराच्या सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेरेसुद्धा पुरवायला तयार आहे. तुम्ही नियम तोडणाऱ्यांविरोधात कारवाई करा. मी तुमच्या पाठिशी आहे, असेही देशमुख म्हणाले. नागपुरातील वाहतूक पोलिसांना अनिल देशमुख यांच्या हस्ते 200 बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. 

पुढे बोलताना अनील देशमुख यांनी शहराच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रकाश टाकला. शहरात घढणाऱ्या गैरप्रकारांवर ड्रोन आणि बॉडी वॉर्न कॅमेरे यांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवता येऊ शकेल. मुंबईत ड्रोन कॅमेऱ्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे, असे अनिल देशमुख म्हणाले. तसेच नागपूर पोलिसांना शहरातील गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची गरज पडल्यास तेही पुरवायला तयार असल्याचे यावेळी देशमुख यांनी सांगितले.

शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले. नागपुरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आगामी काळात त्यात आणखी सुधार करून पब्लिक अनाऊन्स सिस्टम सुरू करता येईल. तसेच स्पोर्ट बाईकवावरुन प्रवास करणारे सर्रास वाहतूक नियमांना तोडतात.  त्यामुळे स्पोर्ट बाईक चालकांरिरोधात कारवाई करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले.

तसेच, यावेळी बोलताना मांजा वापरुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर करवाई करण्याचेही देशमुख यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून मांजामुळे कित्येक नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी कठोर कारवाई करण्याचा आदेश दिले आहेत.