यवतमाळ शिवसेना जिल्हाप्रमुखांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

January 17,2021

यवतमाळ : १७ जानेवारी - यवतमाळ शहरातील एका ले आऊटमधील सिमेंट खांब उखडून फेकण्यासह भिंत पडण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुखांविरोधात अवधूतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

राजेंद्र गायकवाड रा. अमराईपुरा असे तक्रार दाखल झालेल्या जिल्ह्याप्रमुखाचे नाव आहे. त्यांनी शनिवारी दुपारी ले आउट हद्दीत येऊन हद्दीतील सिमेंट पोल उखडून भिंत पडण्याची धमकी दिली होती.  अशी तक्रार अलप कॅटल मॅन्युफ्रॅक्चरिंग कंपनीतर्फे ऍड प्रशांत कोल्हे यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशनला दिली. या कंपनीच्या मालकीच्या जमिनीमध्ये ले आउट उभारणीचे काम सुरु आहे.  सदर ले आउटची मोजणी करून हद्द कायम करण्यात आली आहे. सदर भूखंडाचा कुठलाही वाद नाही. त्यातूनच सिमेंट खांब टाकून सदर हद्द सुरक्षित करण्यात आली आहे. 

शनिवारी यवतमाळचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी बेकायदा जमिनीवर येऊन सिमेंट खांब उखडून फेकले व भिंत पडण्याची धमकी दिली.  सदर घटना सुरक्षारक्षक विठ्ठल कांबळे यांच्यासमक्ष घडली. यामुळे काही काळ  भूखंडावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.