लिंगवर्गीकृत रेतनाद्वारे मादी रेडके पैदाशीचा प्रयोग अकोल्यात यशस्वी

January 17,2021

अकोला : १७ जानेवारी - आतापर्यंत नर किंवा मादी जन्माने हे निसर्गाच्या हातात होते. परंतु शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे हे चित्र बदलले आहे. आता मादी किंवा नर पैदास करावयाचे हे पशुवैद्यकीय डॉक्टर ठरणार असून म्हशींमध्ये लिंग वर्गीकृत रेतनाद्वारे मादी रेडके पैदाशीचा प्रयोग अकोल्यामध्ये यशस्वी झाला आहे. महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठात हा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे.

गाई, म्हशीपासून दूध उत्पादन करणे हा शेतकऱ्यांसाठी उत्तम जोडधंदा आहे. वळू संगोपन करून गाय किंवा म्हैस फळवणे व पुढील वेतासाठी तयार करणे ही खर्चिक बाब पशुपालकांना परवडणारी नाही. त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे म्हैस फळवणे सध्याच्या परिस्थितीत सोपे झाले आहे. परंतु, कृत्रिम रेतनाद्वारे गर्भधारणा करून जर नर पैदा झाला तर त्याचा उपयोग कमी असल्यामुळे पशुपालकांना बऱ्याच प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. गर्भ निर्मिती होताना नर किंवा मादीचा गर्भ तयार होणे हे शुक्राणू ठरवतात. याचा शोध बऱ्याच दशका आधी लागला पण सद्यस्थितीत नवीन तंत्रज्ञानाद्वारे शुक्राणूंच्या केंद्रातील जनुकांच्या प्रमाणाचे मापन करून शुक्राणूंचे लिंग वर्गीकरण करण्यात येते. 

वर्गीकृत शुक्राणूपासून गोठीत वीर्य कांडी तयार करण्यात आल्या असून त्याचा वापर कृत्रिम रेतनासाठी करण्यात येतो. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत नातोक उत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थांच्या पशुप्रजनन विभागामार्फत राबविल्या म्हशीमध्ये लिंग वर्गीकृत मात्रेचा गर्भधारणे करिता परिणाम संशोधन प्रकल्प यशस्वी झाला आहे. या संशोधन प्रकल्प करता आत्मा प्रकल्प संचालक यांच्याकडून एक लाख रुपये निधी प्राप्त झाला होता. पशू प्रजनन व प्रसूतिशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. महेशकुमार इंगवले यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून काम पाहिले. तर प्रकल्पाची अंमलबजावणी करतात पशूप्रजनन व प्रसुतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चैतन्य पावशे, डॉ. सुजाता सावंत, डॉ. प्रवीण शिंदे यांनी सहकार्य केले. प्रवीण घाट व सुशांत गोगटे या पशुपालकांच्या क्षेत्रांना संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता व चमूने भेट देऊन जन्मलेल्या मादी बेडकांची पाहणी केली.

असा राबवला प्रकल्प

विदर्भामध्ये प्रथमच राबविण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये म्हैसवर्गीय तसेच माजाचे एकत्रिकरण केलेल्या म्हशींमध्ये लिंगवर्गीकृत कृत्रिम रेतन करण्यात आले. या प्रकल्पामध्ये २० म्हशींना माजाच्या कालावधीमध्ये लिंगवर्गीकृत रेतनमात्रेमध्ये गर्भधारणेचे प्रमाण ४० टक्के इतके मिळाले. यातून सात मादी रेडके जन्मास आली. लिंगवर्गीकृत रेतनाद्वारे मादी रेडके मिळण्याचे प्रमाण ८७.५० टक्के होते. लिंगवर्गीकृत रेतनमात्रेचा दर एक हजार रुपये प्रतिरेतन मात्रा इतका झाला असून, यामुळे उच्च वंशावळ असणाऱ्या मुऱ्हा प्रजातीच्या म्हशीच्या मादी वासरे पुढील पिढी म्हणून तयार झाली आहेत.