शेतीमाल आयात धोरणावर सरकार गप्प का? बच्चू कडूंचा सवाल

January 17,2021

अमरावती : १७ जानेवारी - केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीलवरील बंदी हटवली असली, तरी कांद्याच्या भावाचा प्रश्न कायम आहे. कांद्याच्या दरावरूनच राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोदी सरकारला बांगलादेशचं उदाहरण देत सवाल केला आहे. “एकीकडे शेतकरी हिताचे तीन कायदे आहेत. शेतीमालास भाव मिळेल असं सांगणारे आयात धोरणावर का गप्प बसलेले आहे?,” असा सवालही कडू यांनी सरकारला विचारला आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे. मात्र, कांद्याचे भावांना अद्यापही उठाव मिळालेला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, कांद्याच्या दरावरून राज्याचे मंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे. “मागील महिन्यापासून भारताने निर्यातबंदी मागे घेतली. यामुळे बांगलादेशात लाल कांद्याची आयात सुरू झाली. परंतु तेथील शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून, बांगलादेशनं कांद्यावर दहा टक्के आयातकर लावला. यामुळे आयातीत कांद्याचे सौदे तोट्यात गेले. आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्याकडे वरील प्रकारे आयातकर लावून स्थानिक शेतकऱ्यांचं होणार्या नुकसानापासून वाचवावं. निर्यातबंदी व आयातीस मोकळे रान उपलब्ध करून देणार्या धोरणांचा आम्ही सक्रियपणे विरोध करणार आहोत,” असा इशारा बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला दिला.

“एकीकडे शेतकरी हिताचे तीन कायदे आहेत. शेतीमालास भाव मिळेल असं सांगणारे आयात धोरणावर का गप्प बसलेले आहेत? बांगलादेशला जे जमले ते भारताला का नाही? यामुळे सरकार कोणासाठी काम करते हे स्पष्ट लक्षात येत आहे,” अशी टीका कडू यांनी मोदी सरकारवर केली आहे.