वीजतारांच्या संपर्कामुळे बस पेटली, ६ प्रवासी जागीच मृत

January 17,2021

जयपूर : १७ जानेवारी - राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील महेशपुरा गावांत काल रात्री एक भीषण दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली एक बस वीज तारांच्या संपर्कात आली. त्यामुळे बसने पेट घेतला तसेच २० पेक्षा जास्त प्रवाशांना विद्युत प्रवाहाचा जबरदस्त झटका बसला. या भीषण दुर्घनटनेत सहा प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना स्थानिक जोधपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.

जालौरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सात गंभीर जखमींना जोधपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याशिवाय अन्य १३ प्रवाशांवर स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार प्रवाशांनी भरलेली ही बस रस्ता चुकल्याने गावात पोहचली होती. ही बस मांडोलीहून ब्यावरकडे निघाली होती. मात्र रात्री रस्ता चुकल्याने ती महेशपुरा गावात आली होती. त्यानंतर गावातील वीज तारांशी संपर्क झाल्याने बसने पेट घेतला व भीषण दुर्घटना घडली.