शाहनवाज हुसैन आता विधानपरिषदेत जाणार

January 17,2021

पाटणा : १७ जानेवारी - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सैयद शाहनवाज हुसैन यांना भाजपाने बिहार विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. 

बिहार विधान परिषदेच्या दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी भाजपाने हुसैन यांची उमेदवारी जाहीर केली. दुसर्या जागेचा उमेदवार भाजपाने अद्याप जाहीर केला नाही. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि विजय नारायण झा यांनी राजीनामा दिल्यामुळे विधान परिषदेच्या दोन जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सुशीलकुमार मोदी राज्यसभेत आले तर विजय नारायण झा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. 

या दोन जागांसाठी 28 जानेवारीला मतदान होणार आहे. 18 जानेवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तिथी आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये शाहनवाज हुसैन नागरी उड्डयण मंत्री होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, तर 2019 मध्ये भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. बिहारच्या राजकारणात सक्रिय असलेले सुशीलकुमार मोदी यांना भाजपाने राष्ट्रीय राजकारणात आणले, तर आतापर्यंत राष्ट्रीय राजकारणात असलेले शाहनवाज हुसैन यांना बिहारच्या राजकारणात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यावर भाजपा हुसैन यांना मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. भाजपाने उत्तर प्रदेशमधील विधान परिषदेच्या सहा जागांसाठीचे उमेदवारही जाहीर केले आहे.