अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक

January 17,2021

अमरावती : १७ जानेवारी अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात लवकरच मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पालकमंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी कृती समितीला दिले. शुक्रवार, 15 जानेवारीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती अमरावतीचे संयोजक किरण पातुरकर, डॉ. अविनाश चौधरी, चेंबर ऑफ कॉमर्सचे विनोद कलंत्री, आय. एम. ओ. चे डॉ. नागलकर, स्वयंसिद्धच्या प्रा. मोनिका उमक, दीपक खताडे यांनी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांची या संदर्भात भेट घेऊन चर्चा केली. 

संयोजक किरण पातुरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये घोषित केल्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात लोकप्रतिनिधींची भेट घेण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार सर्वप्रथम जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेतली आणि अमरावतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे, त्यासाठी मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव आणून तशी मान्यता घ्यावी, निधी मंजूर करावा आणि डिनची नियुक्ती करावी, अशा मागण्या केल्या. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक लावावी, अशीही मागणी सुद्धा केली. 

यावेळी पालकमंत्र्यांनी कृती समितीला सांगितले की, 14 जानेवारीला मंत्रीमंडळाच्या बैठकीत अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाविषयी चर्चा झाली असून लवकरच मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव तयार होईल, तसेच याबाबत त्यासुद्धा पूर्ण प्रयत्न करतील. 

कृती समितीचे संयोजक किरण पातुरकर आणि सदस्यांच्या आग्रहानुसार पालकमंत्र्यांनी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक लावण्याचेही मान्य केले. पुढच्या सत्रापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अमरावतीमध्ये प्रवेश सुरू होतील, आणि यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही त्या म्हणाल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी केलेल्या सततच्या पाठपुराव्याबद्दल त्यांनीकिरण पातुरकर आणि कृती समितीची प्रशंसाही केली.