महाजेनकोच्या निर्मिती संचालकपदी ऊर्जामंत्र्यांच्या मर्जीतील नियुक्ती करण्यासाठी मुलाखतींचा फार्स - विश्वास पाठक

January 17,2021

नागपूर : १७ जानेवारी - राज्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या मर्जीतील व्यक्तीची महाजेनकोच्या निर्मिती संचालकपदी पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सध्या मुलाखतींचा फार्स चालू आहे. निवृत्त  कर्मचार्यांना पुन्हा सेवेत घ्यायचे नाही असे म्हणत त्या नियमाला बगल देण्यामागे कोणाचे हितसंबंध दडले आहेत का? याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी, भाजपा प्रदेश माध्यम विभागप्रमुख विश्वास पाठक यांनी केली. ऊर्जा खात्याचे माजी संचालक असलेल्या पाठक यांनी सांगितले की, महाजेनकोचे निर्मिती संचालकपद गेल्या पाच महिन्यांपासून रिक्त आहे. या पदावर कार्यरत असलेल्या थोटवे हे ३१ ऑगस्ट २0२0 रोजी सेवानवृत्त झाले आहेत. त्यांचीच या पदावर पुन्हा नियुक्ती व्हावी, यासाठी कोरोना कालावधीत घाईघाईने २७ ऑगस्ट रोजी १0 उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीमधून दोन उमेदवारांची निवड झाली. मात्र या नावांमध्ये थोटवे यांचे नाव नसल्यामुळे या मुलाखतीचे निकाल जाहीर केले नाहीत. र्मजीतल्या व्यक्तीची निवड झाली नाही म्हणून वरिष्ठांनी पूर्ण निवड प्रक्रियाच रद्द करून निवडल्या गेलेल्या उमेदवारांवर अन्याय केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.