केतन ह्युंदाई शोरूमला आग, ५० लाखांचे नुकसान

January 17,2021

नागपूर : १७ जानेवारी - वाडी नाक्याजवळून हाकेच्या अंतरावर नागपूर दिशेला काचीमेंट परिसरात महामार्गावर असणार्या केतन हय़ुंडई कारची विक्री व देखभाल केंद्राला शनिवारी (१६ जानेवारी) अचानक आग लागल्याने कर्मचारी व उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. यात जवळपास ५0 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

प्राप्त माहितीनुसार, गौतम काळे यांच्या मालकीच्या असलेल्या या केंद्राच्या माध्यमातून कारची विक्री व सर्व्हिसिंग सेवा ग्राहकांना प्रदान केली जाते. त्यासाठी शोरूमच्या मागच्या बाजूला सेवाकेंद्र देखील स्थापन केले आहे. शनिवारी ११ वाजताच्या सुमारास या ठिकाणी कारच्या देखभालीचे कार्य सुरू असताना अचानक पेंट ब्रुस्ट पॅनलला ठिणगी उडून आग लागल्याचे समजते. जवळपास ज्वालाग्राही रसायनचा संपर्क आल्यामुळे जवळपासची यंत्रसामुग्री व शेडला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच उपस्थित कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली होती. त्वरित ही सूचना कंपनीच्या अधिकार्यांनी पोलिस व अग्निशमन विभागाला दूरध्वनीद्वारा दिली. सूचना प्राप्त होताच वायुसेनेचे अग्निशमन वाहन, मनपाचे नरेंद्रनगर, त्रिमूर्तीनगर अग्निशमन वाहन तसेच वाडी नगर परिषदेचे अग्निशमन वाहन, असे एकूण ४ वाहन घटनास्थळी पोहोचले. या सर्वांनी संयुक्तपणे कार्यवाही करीत लागलेली आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये कार सर्व्हिसिंग विभाग जळून खाक होऊन अंदाजे ५0 लाखांपेक्षा अधिकचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुमाँ प्यारेवाले यांच्या निर्देशानुसार अग्निशमन विभागाचे अधिकारी रोहित शेलारे यांच्या मार्गदर्शनात फायरमन अनुराग पाटील, आनंद शिंदे, वैभव कोळकर, वाहन चालक नितेश वगैरे यांनी आग विझविण्याच्या कार्यात मोठे सहकार्य केले. वाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनीसुद्धा घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.