महावितरणच्या अकोला परिमंडळात ५०५ कोटींची वीजबिल थकबाकी

January 17,2021

अकोला: १७ जानेवारी - महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत असलेल्या अकोला,बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक , औद्योगिक ,पाणीपुरवठा आणि नगरपालिका महानगपालिकेच्या पथदिव्याच्या वीज बिलाची एकून थकबाकी ही ५०५ कोटींवर पोहचली असल्याने महावीतरणची आर्थिक घडी विस्कटली आहे. 

महावितरणच्या एकूण महसूलाचा ८५% खर्च हा विजेच्या खरेदीवर होत असतो आणि उर्वरित १५ टक्क्यात कर्मचाऱ्यांचा पगार,कार्यालयीन खर्च व इतर सर्व कामासाठी होतो. पण, ताळेबंदीनंतर वीज बिल वसूलीचे चक्रच थांबल्याने महावितरणसमोर मोठे आर्थीक संकट निर्माण झाले आहे. 

ताळेबंदीनंतर डिसेंबर २०२० अखेर अकोला परिमंडळातील वीज ग्राहकांकडे एकूण ५०५ कोटी १७ लाख रूपयांची थकबाकी आहे.यात घरगुती ग्राहकांकडे २९८ कोटी ४० लाख, वाणिज्यिक ग्राहकांकडे ४७ कोटी ०४ लाख,औद्योगिक ग्राहकांकडे ४५ कोटी ४९ लाख, पाणी पुरवठा योजनांकडे ९७ कोटी ७१ लाख, तीनही जिल्ह्यातील नगरपालिका आणि अकोला महानगरपालिकेकडे पथदिव्यांचे १६ कोटी ५३ लाख रूपयाचा समावेश आहे. टाळेबंदी नंतर वीज बिल वसूली न झाल्याने महावितरण आर्थीक संकटात आहे. वीजबिल भरून ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले असून, थकीत बीज बिलापैकी निम्मे बिल शासकीय यंत्रणेचे आहे हे विशेष.