आर्णीतील मृत मोर बर्ड फ्ल्यूने बाधित असल्याचा अहवाल

January 17,2021

यवतमाळ : १७ जानेवारी - आर्णी तालुक्यातील खंडाळा येथील शेतशिवारात गेल्या रविवारी दुपारी 8 मोर मरण पावले होते. त्यातील 3 मोरांचे नमुने परीक्षणासाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल शनिवार, 16 जानेवारी रोजी आला असून हे मोर ‘एव्हिएन इन्फ्ल्युएन्झा’ या ‘बर्ड फ्ल्यु’सदृष आजाराने बधित असल्याचे त्यात म्हटले आहे. 

या अहवालामुळे खंडाळा आजूबाजूच्या 10 किमी क्षेत्र ‘अलर्ट झोन’ घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रात कुक्कुट प्रवर्गातील पक्ष्यांच्या आवागमन, विक्री व प्रदर्शन करू नये, तसेच ‘बर्ड फ्लू’च्या अनुषंगाने खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी दिले आहेत. आर्णी तालुक्यातील खंडाळा शेत शिवारात जांबनिवासी ज्ञानेश्वर इंगोले यांच्या शेतात रविवार, 10 जानेवारीला 8 मोर मृत आढळून आले होते. त्यांनी याची माहिती त्वरित आर्णी येथील पशुसंवर्धन आणि वनविभागाला दिली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांनी त्यांच्या शेतात जाऊन पंचनामा केला व मोरांचे मृतदेह वनविभागाच्या सुपूर्द केले. 

या मोरांचा मृत्यू कशाने झाला याच्या तपासणीसाठी 3 मोरांचे नमुने अकोला प्रयोगशाळे मार्फत भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानला पाठविले. संस्थानकडून आलेला अहवाल सकारात्मक असल्यामुळे खंडाळा व त्याच्या सभोवताल 10 किमी क्षेत्राला उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी ‘अलर्ट झोन’ घोषित केले आहे. या दरम्यान पशुसंवर्धन अधिकार्यांकडून सगळ्या कुक्कुटपालन केंद्र चालक व नागरिकांना सतर्क राहून खबरदारी घेण्याची निर्देश दिले आहेत. कुठेही अशाप्रकारे पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले तर वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकार्यांना त्वरित तशी माहिती द्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण व आर्णी दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी रूद्रेश रोडगे यांनी केले आहे.