वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिला जखमी

January 17,2021

गडचिरोली : १७ जानेवारी - गडचिरोली शहर व तालुका परिसरात मागील एक ते दीड महिन्यांपासून वाघासह, बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे. वनविभागाद्वारे नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला जात असतांनाही नागरीक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे, १६ जानेवारी रोजी वेगवेगळ्या ठिकाणी वाघ व बिबट्याने हल्ला  करून दोन महिला जखमी केल्याच्या घटनेवरुन स्पष्ट होते. जमखींमध्ये गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथील सुमित्रा वसंत भोयर (५0)व धानोरा तालुक्यातील काकडयेली येथील तुळशिबाई हलामी (७0) असे जखमी महिलांची नावे आहेत. 

प्राप्त माहितीनुसार गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथील सुमित्रा भोयर ही आज सहकारी महिलांसोबत चातगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या दिभना-कळमटोला मार्गावरील जंगल परिसरात झाडू कापण्यासाठी गेली होती. दरम्यान दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अचानक वाघाने सुमित्रावर हल्ला चढविला. यावेळी जवळच असलेल्या महिलांनी आरडाओरड केल्याने वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला. मात्र यात सुमित्रा गंभीर जखमी झाली. तिला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दुसर्या घटनेत धानोरा तालुक्यातील काकडयेली येथील वृद्ध महिला आज पहाटेच्या सुमारास घराजवळील शेतात शौचालयास गेली होती. शौचालयावरून परत येत असतांना बिबट्याने वृद्ध महिलेवर हल्ला केल्याने तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारार्थ धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. संबंधित जखमी महिलांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. आज एकाच दिवशी वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिला जखमी झाल्याने वाघाचा व बिबट्याचा वावर अद्यापही तालुक्यातील जंगल परिसरात कायम असल्याचे दिसून येत आहे.