घ्या समजून राजे हो.....डॉ. यशवंत मनोहरांची पुरस्कार वापसी... पब्लिसिटी स्टंट की दबावातील माघार...?

January 16,2021

 

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी या वर्षीचा विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार आधी स्वीकारण्याचे मान्य करून ऐनवेळी नाकारल्यामुळे फक्त नागपूरच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वाड्मयीन विश्‍वात एकच खळबळ उडाली आहे. विशेषतः पुरस्कार वितरण सोहळ्यात सरस्वतीचे छायाचित्र ठेवून त्याचे विधीवत पूजन केले जाते आणि मी प्रखर इहबुद्धिवादी असल्यामुळे हे प्रकार मला मान्य नसून त्यामुळेच मी हा पुरस्कार नाकारत असल्याचे मनोहरांनी कार्यक्रमाच्या दोन तास आधी कळवल्यामुळे विविध चर्चांना पेव फुटले आहे.

डॉ. यशवंत मनोहर हे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक म्हणून ख्यातनाम आहेतच. याशिवाय आंबेडकरी समाजातील विचारवंत म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे. हिंदू धर्मातील प्रथा परंपरांना त्यांनी कायम विरोध केला आणि त्या विरोधातूनच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

भारतीय लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सोयीनुसार निर्णय घेण्याची मुभा आहे. त्यानुसार डॉ. मनोहरांनी हा पुरस्कार नाकारला त्याला आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. तरीही त्यानिमित्ताने जो वाद सुरु झाला आहे त्यामुळे या विषयावर आज मी लेखणी उचलली आहे.

माझ्याकरिता डॉ. यशवंत मनोहर हे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. मराठीतील एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून त्यांचे मी वेळोवेळी मार्गदर्शनही घेत असतो. 2002 ते 2011 या काळात मी रामटेकच्या गडावरून या नियतकालिकाचे संपादन आणि प्रकाशन करीत होतो. त्यावेळी संपादकीय सल्लागार म्हणून मनोहर सरांनी मला मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांच्याच प्रेरणेने मी मराठी वाड्मयविश्‍वात दोन परिसंवाद आयोजित केले आणि ते गाजलेही होते. या परिसंवादाचे प्रकाशित पुस्तक मराठी वाड्मय व्यवहार चिंतन आणि चिंता हे देखील चांगलेच गाजले आणि राज्य शासकीय पुरस्काराचे मानकरीही ठरले. याशिवाय माझ्या खिडकीतले आकाश या मी लिहिलेल्या ललित लेख संग्रहाला मनोहर सरांची प्रस्तावनाही आहे. एकूणच अत्यंत जिव्हाळ्याचे असे आमचे संबंध आहे. तरीही जे काही घडले त्यावर आदरणीय मनोहरसरांची माफी मागून मी आज लिहण्याचा निर्णय घेतला आहे.

आधी नमूद केल्यानुसार लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आपली मते व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आपल्या लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला विचारस्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्यही बहाल केले आहे. त्यानुसार आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करावा किंवा आपण निधार्मिक म्हणजचे सेक्युलर भूमिका बाळगावी हे देखील प्रत्येकाला ठरवण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मनोहर  सरांनी हा पुरस्कार नाकारल्यास आक्षेप घेण्याचे मला तरी काही कारण वाटत नाही.

मात्र ज्या पद्धतीने या घटना घडल्या त्या बघता इथे कुठेतरी काहीतरी पाणी मुरते की काय अशी शंका घेण्यास निश्‍चित वाव आहे. ज्या दिवशी हा कार्यक्रम झाला त्या दिवशी मी कार्यक्रमस्थळी उपस्थित नव्हतो. मात्र या संदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या आणि त्यावर विविध मान्यवरांनी व्यक्त केलेली मते मी वाचली आहेत. त्यामुळेच इथे पाणी मुरत असल्याची मला शंका येते आहे.

विदर्भ साहित्य संघाच्या वतीने दिल्या जाणार्‍या पुरस्कारांमध्ये जीवनव्रती हा सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जातो. विदर्भातील अनेक मान्यवर सारस्वत या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. उभी हयात वाड्मय सेवा करणार्‍या साहित्यिकालाच हा पुरस्कार दरवर्षी सन्मानपूर्वक दिला जातो. त्यामुळे डॉ.यशवंत मनोहर यांचे मराठी वाड्मय विश्‍वात असलेले योगदान लक्षात घेऊन विदर्भ साहित्य संघाने त्यांची जीवनव्रती पुरस्कारासाठी केलेली निवड ही योग्यच ठरते. विदर्भ साहित्य संघ आणि डॉ. यशवतं मनोहर यांचे अनेक मुद्यांवर वैचारिक मतभेद आहेत. त्यामुळे विदर्भ साहित्य संघाच्या कोणत्याही उपक्रमात डॉ. यशवंत मनोहरांचा सहभाग दिसत नाही. तरीही विदर्भ साहित्य संघाने मनोहरांसोबत असलेले वैचारिक मतभेद बाजूला ठेवत त्यांच्या प्रदीर्घ वाड्मयसेवेचा सन्मान करण्याचा घेतलेला हा निर्णय निश्‍चितच अभिनंदनीय ठरतो.

मला मिळालेल्या माहितीनुसार मनोहर सरांना हा सन्मान सुमारे एक  महिन्यापूर्वीच जाहीर झाला होता. तत्पूर्वी त्यांना विदर्भ साहित्य संघाने रितसर पत्र पाठवून या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली असल्याचे कळवून हा पुरस्कार आपण स्वीकारणार किंवा कसे याबाबत त्यांची परवानगीही घेतली होती. त्यावेळी मनोहर सरांनी पुरस्कार स्वीकारण्यास मान्यताही दिली होती. इतकेच काय पण विदर्भ साहित्य संघाचे विविध पुरस्कार जाहीर झाल्यावर या सर्व पुरस्कारार्थींचे सत्काराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यातील प्रमुख समारंभांना हजेरी लावून ते सत्कारही मनोहर सरांनी आनंदाने स्वीकारले होते. सरांची पुरस्कारासाठी निवड झाल्याच्या बातम्याही सर्व वृत्तपत्राने ठळकपणे दिल्या होत्या. त्यालाही सरांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता.

मात्र 14 जानेवारी रोजी म्हणजेच पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दिवशी समारंभांच्या दोन तास आधी डॉ. यशवंत मनोहरांनी विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकार्‍यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पत्र पाठवून आपण पुरस्कार स्वीकारत नसल्याचे कळवले. पुरस्कार न स्वीकारण्यामागे आपण प्रखर यह बुद्धिवादी असल्यामुळे आपल्या समारंभात होणारे सरस्वती पूजन मला मान्य नाही, आणि आपण ते करणारच अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे मी समारंभात येऊन पुरस्कार स्वीकारू शकत नाही अशा आशयाचे ते पत्र होते.

विदर्भाची भूमी ही सारस्वती जन्मभू असल्याचा गौरव राजशेखर, भवभूती अशा विद्वान संस्कृत कवींंनी केला आहे. प्राचीन संस्कृत साहित्यात त्याची नोंदही आहे. विदर्भाच्या सीमेवर असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या टोकाला असलेल्या पद्मपूर या गावी भवभूती या संस्कृत कवीने पहिली संस्कृत काव्यरचना केली होती असे इतिहासकार सांगतात. त्यामुळेच या भूमीचा सारस्वती जन्मभू असा उल्लेख केला आहे. विदर्भ साहित्य संघानेही हा उल्लेख मान्य केला आहे. त्यामुळे विदर्भ साहित्य संघाच्या बोधचिन्ह्यात गाजलेल्या संस्कृत गीतातील विदर्भ विषयः सारस्वती जन्मभू या ओळीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सरस्वती देवीचे उपासक हेच सारस्वत म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सरस्वतीचे अस्तित्व मान्य करीत अशा सारस्वतांची ही भूमी असल्याचे मान्य करीत विदर्भ साहित्य संघाने गेली 9 दशके आपली वाटचाल केली आहे. हे करत असताना त्यांनी सर्व प्रथा परंपरांचा योग्य तो सन्मान ठेवला आहे. त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवून सरस्वतीचे पूजन करणे ही परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे.

डॉ. यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाचे पुरस्काराबाबत माहिती देणारे पत्र त्यांच्या लेटरहेडवरच गेले होते. या लेटरहेडवर साहित्य संघाचे बोधचिन्ह आहे. त्यामुळे देवी सरस्वतीचा आणि साहित्य संघाचा असलेला जवळचा संबंध जगजाहीर होता. असे असतानाही मनोहर सरांनी हा पुरस्कार स्वीकारण्याचा निर्णय घेतला. वस्तुतः प्रखर इहबुद्धिवादी या नात्याने जर सरस्वतीचे अस्तित्वतच सरांना मान्य नसेल तर ते बोधचिन्ह पाहूनच सरांनी पुरस्कार नाकारायला हवा होता. मात्र यावेळी त्यांनी हे धाडस दाखवले नाही. त्यांनी पुरस्काराला स्वीकृती दिल्याचे पत्र साहित्य संघाला पाठविल्याची माहिती मला मिळाली. जर सरस्वती पूजन मान्य नव्हते तर पुरस्कार स्वीकारण्याचे पत्र देतानाच त्यात मनोहर सरांना तशी अट टाकता आली असती. मात्र तशी कोणतीही अट त्यांनी टाकल्याची माहिती मला मिळाली नाही.

त्यानंतर सर्व पुरस्कार विजेत्यांचे काही ठिकाणी सत्कारही झाले. त्यातील एका सत्कारात श्रीगणेश मूर्ती ठेवून त्याचे पूजनही करण्यात आल्याची माहिती मिळाली. तरीही सरांनी हा सत्कार स्वीकारला. मग ऐनवेळीच असे काय घडले की सरांना सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन मान्य नसल्याने त्यांनी पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला? महाराष्ट्रातील मराठी वाड्मयविश्‍व हे रहस्य जाणून घेण्यास उत्सुक निश्‍चितच आहे, नव्हे त्यांचा तो अधिकारही आहे.

भारतीय लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपल्या श्रद्धा जपण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याचवेळी इतरांच्या श्रद्धांचा अवमान आम्हाला करता येत नाही. सरस्वतीचे पूजन मनोहर सरांना मान्य नसू शकते. अशा वेळी समारंभात येऊनही पूजनाच्या वेळी शांतपणे ते मागे उभे राहिले  असते आणि नंतर पुरस्कार स्वीकारला असता तर त्यांची शान राहिली असती. इथे मला माजी राष्ट्रपती स्व. प्रणव मुखर्जी यांची आठवण येते. प्रणव मुखर्जी हे कट्टर काँग्रेसी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांचा कायम विरोध होता. तरीही संघाच्या एका समारंभात प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी निमंत्रण स्वीकारले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथेनुसार त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचे श्रद्धेचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला प्रणाम करुन प्रार्थना म्हटली जाते. काँग्रेसने या प्रथांचा कायम विरोध केला. मात्र संघाच्या समारंभात उपस्थित असलेल्या प्रणवदांनी प्रार्थनेच्या वेळी शांतपणे उभे राहून संघाच्या श्रद्धांचा सन्मान केला. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शेजारी प्रणवदा शांतपणे उभे होते. व्यासपीठावरील इतर मान्यवरांनी ध्वजप्रणामाची पोझ घेतली होती. प्रणवदा मात्र काहीही न बोलता शांतपणे उभे राहिले आणि आपली तत्त्वे जपत संघ परंपरांचा त्यांनी योग्य असा सन्मान केला. प्रणवदांची ही कृती खरोखरी स्वागतार्ह ठरली होती.

या पार्श्‍वभूमीवर डॉ. यशवंत मनोहरांचे वर्तन राहिले असते तर त्यांच्या आजवर गाठलेल्या वैचारिक उंचीला साजेसे असे त्यांचे वर्तन दिसले असते. त्यांच्या या वर्तनाचे स्वागतही झाले असते. मात्र तसे झाले नाही. परिणामी डॉ. मनोहरांसारखा विद्वान विचारवंत अकारण टिकेचा धनी झाला आहे.

या प्रकरणात विदर्भ साहित्य संघावर ब्राह्मण्यांचा ठपका ठेवणार्‍या कथित पुरोगामी विचारवंतांनी केलेल्या कुजबुजीमुळे ऐनवेळी अशी माघार मनोहरांना घ्यावी लागली अशीही चर्चा कानावर आली. मात्र अशा कुचबुजीला घाबरून मनोहर आपला निर्णय बदलतील असे मला तरी वाटत नाही. मग या मागे नेमके कारण काय हा प्रश्‍न माझ्यासारख्या अनेकांना भेडसावतो आहे. त्यामुळे काहींच्या मते हा डॉ. मनोहरांचा पब्लिसिटी स्टंट आहे तर काहींच्या मते कोणाच्या तरी दबावात त्यांनी घेतलेली ही माघार आहे.

हा पब्लिसिटी स्टंट असो की दबावातील माघार, मात्र या सर्वप्रकारात डॉ. यशवंत मनोहरांसारख्या थोर साहित्यिकाच्या बाबत मराठी वाड्मय विश्‍वात असलेल्या आदराच्या स्थानाला कुठे धक्का तर बसत नाही ना अशी शंका अनेक रसिकांच्या मनात निर्माण होते आहे. याबाबत गांभिर्याने विचार होणे गरजेचे आहे.

यातून निष्कर्ष एकच काढता येतो लोकशाहीत तुम्हाला तुमचे निर्णय स्वतः घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र आपले निर्णय वादग्रस्त तर ठरणार नाही ना यावर चिंतन करुन मगच निर्णय व्हायला हवेत. डॉ. यशवंत मनोहरांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीचे निर्णय चुकले असे म्हणण्याचा अधिकार माझ्यासारख्या पामराला निश्‍चितच नाही. तरीही नेमके काय चुकले याचा विचार सर्वच संबंधितांनी करायला हवा इतकेच मला सुचवावसे वाटते. 

 

  तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....

ता.क.ः घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या ुुु.षरलशलेेज्ञ.लेा/इश्रेससशीर्ईंळपरीहझरींहरज्ञ या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

 

                                                    -अविनाश पाठक