बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमिवर ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर येथे आयसोलेशन वाॅर्ड

January 13,2021

नागपूर : १३ जानेवारी - राज्यात सुरू असलेल्या बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमिवर नागपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर येथे आयसोलेशन वाॅर्ड सुरू करण्यात आला आहे. हॉस्पिटलपासून वेगळा असलेल्या आयसोलेशन वार्डमध्ये ट्रान्झिटला येणारे सगळे पक्षी दाखल होणार आहे, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी दिली. या पक्ष्यांची तपासणी आयसोलेशन वार्डमध्येच होणार असून पुढील उपचारासाठी त्यांना तिथेच  ठेवल्या जाईल. 

येणाऱ्या जखमी पक्ष्याकडून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असणाऱ्या पक्षी, प्राण्यांना कुठलीही लागण होणार नाही म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी व काही आढळल्यास महाराष्ट्र शासनाच्या  पशु संवर्धन विभागाच्या हेल्पलाइन नं वर फोन करावा, असे आवाहन हाते यांनी दिले आहे.

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील उबगी फार्मवर सुमारे २५० कोंबड्या मेल्याने खळबळ माजली आहे.  राज्यात आलेल्या बर्ड फ्ल्यूच्या साथीमुळे या कोंबड्यांना रोगाची लागण झाली होती का, अशी शंकाही उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्ह्याच्या उपायुक्त मनीषा पुंडलिक यांनी दिली.