कौशल्याभिमुख अभ्यासक्रमाची बेरोजगार उमेदवारांना संधी

January 13,2021

नागपूर : १३ जानेवारी -  कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत प्रधानमंत्री कौशल्य विकास अभियान 3.0 टप्पा सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवार, 15 जानेवारीला दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात येणार असून संपूर्ण देशात या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सेक्टर स्किल कौन्सिलमार्फत तयार केलेले अल्पमुदतीचे कौशल्याभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या केंद्रांमधील इच्छुक बेरोजगार उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देतील.

कौशल्य प्रशिक्षणप्राप्त उमेदवारांना प्रशिक्षणानंतर विविध क्षेत्रामध्ये रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या अभियानांतर्गत 773 उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात नागपूर आणि रामटेक येथे पंतप्रधान कौशल्य प्रशिक्षण केंद्र आहे. उर्वरित राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, नवी दिल्ली संलग्न कृती केंद्र, नागपूर शहर व जिल्ह्यातील इतर तालुक्यात कार्यरत आहे. अल्पमुदतीचे विविध कार्यक्रम या केंद्रांकडे आहेत.

सर्व प्रशिक्षण मोफत असून उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अभ्यासक्रम शुल्क आकारले जाणार नाही. जिल्ह्यातील 15 ते 45 वयोगटातील उमेदवार या अभियानांतर्गत प्रशिक्षण घेऊन रोजगार तसेच स्वयंरोजगार निर्माण करू शकतात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्रमांक 2, दुसरा माळा, सिव्हिल लाईन्स, नागपूर, दूरध्वनी क्रमांक 0712- 2531213 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्र.ग. हरडे यांनी केले आहे.