हिंगणघाटमध्ये ८ मोरांचा मृत्यू

January 13,2021

नागपूर : १३ जानेवारी - राज्यात सध्या बर्ड फ्लूची साथ सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथे 800 कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाला होता. राज्यात बर्ड फ्लूचे सावट असतानाच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव दातार परिसरात आठ मोरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच पशुवैद्यकीय विभागाला देखील पाचारण करण्यात आले आहे. या मृत मोरांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर या मोरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. जोपर्यंत मोरांच्या मृत्यूचे कारण समोर येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे अवाहन वनविभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. राज्यात सध्या बर्ड फ्लूची साथ पसरत असल्याने, या मोरांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.