महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस - राजेश टोपे

January 13,2021

मुंबई : १३ जानेवारी - पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले असल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलाय. केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लस दाखल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  बातचित केली.

राजेश टोपे म्हणाले की, "मला समाधान आहे, आपण लसीकरणासाठी आठ लाख लोकांच्या नावाची नोंदणी केली आहे. त्याच्या तुलनेत लसीचे डोस थोडे कमी आले आहेत. पण जेवढी लस आली आहे ती लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये निश्चितपणे पोहोचेल. तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या रात्रीपर्यंत लस पोहोचेल. तसेच 15 जानेवारीपर्यंत सर्व लसीकरण केंद्रांवर ही लस 100 टक्के पोहोचणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीची साठवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणं मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेली आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "16 जानेवारी रोजी सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचं उद्घाटन करतील. महाराष्ट्रातील दोन रुग्णालयं एक कूपर रुग्णालय आणि दुसरं जालन्यातील जिल्हा रुग्णालय पंतप्रधानांशी यावेळी थेट संवाद साधू शकणार आहेत. अशा प्रकारे 16 जानेवारीला देशासह राज्यात लसीकरणाचं उद्घाटन केलं जाणार आहे."

लसीकरण केंद्रांबाबत बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की, "दोन दिवसांपूर्वी मी नियोजन केलं होतं की, ते 511 लसीकरण केंद्रासाठी केलं होतं. पण काल झालेल्या बैठकीत केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने सूचना दिल्या की, लसीकरण एवढ्या मोठ्या स्तरावर करु नका. कारण लसीकरणासोबतच रुग्णालयातील इतर सेवाही सुरळीत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे केंद्राच्या सूचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्या 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आला आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 जणांना लस देण्यात येईल. अशाप्रकारे पहिल्या दिवशी 35 हजार जणांना लस देण्याचा आमचा मानस आहे."