अंकिता पिसुड्डे प्रकरणात ४ तास चालली उलटतपासणी

January 13,2021

वर्धा : १३ जानेवारी - अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात प्रत्यक्षदश्री १९ वर्षीय साक्षदाराची साक्ष झाली. आरोपी पक्षाच्या वकिलाकडून उलटतपासणी तब्बल चार तास चालली. तसेच मृतक अंकिताच्या वडिलांचीही साक्ष झाली. साक्षीदरम्यान ते गहिवरले होते. या प्रकरणात उद्या  आणखी चार साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या जाणार आहेत. 

अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात प्रत्यक्ष सुनावणीचा  दुसरा दिवस होता. सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली. सरकारी पक्षातर्फे प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी भाग घेतला. त्यांना सरकारी वकील अँड. प्रसाद सोईतकर यांनी सहकार्य केले. कामकाजाच्या सुरुवातीला या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रत्यक्षदश्री साक्षीदार अभय तळवेकर याची साक्ष झाली. कोर्टात त्याने आपण आरोपी विकेशला अंकिताच्या अंगावर पेट्रोल टाकताना पाहिले तसेच पळून जाताना त्याचा चेहराही बघीतला असल्याचे कथन केले. त्याने कोर्टात पीडितेची हॅण्डबॅग तसेच आरोपीने अंकिताच्या अंगावर पेट्रोल टाकताना वापरलेली प्लास्टिकची बॉटल ओळखली. याआधी त्याने न्यायालयीन कोठडीत आरोपीला ओळखले होते. आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याचे वकील भूपेंद्र सोने यांनी या साक्षीदाराचा उलटतपास केला. वकिलाच्या प्रश्नाला हा युवक अतिशय खंबीरपणे सामोरे गेला, असे सरकारी पक्षातर्फे सांगण्यात आले. सकाळी ११ वाजता त्याची साक्ष सुरू झाली. दुपारी अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर ३ वाजून १५ मिनिटापयर्ंत त्याची साक्ष चालली. त्यानंतर सरकारी पक्षातर्फे मृतक अंकिताचे वडील अरुण नागोराव पिसुड्डे यांचा सरतपास पूर्ण झाला. दरम्यान, आरोपीचे वकील भूपेंद्र सोने यांनी उलटतपास करण्यासाठी अर्ज करून वेळ मागितला. न्यायालयाने तो मान्य केल्याने पुढे कामकाज चालले नाही. सोमवारी अभियोग पक्षाच्यावतीने शव परीक्षण पंचनाम्याच्या पंच साक्षीदार नागपूरच्या देशमुख, मातोश्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर आणि घटनास्थळवरील पंच सचिन बुटले या तीन जणांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या होत्या. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण ७७ साक्षीदार आहेत. त्यातील साक्ष सरकारी पक्षातर्फे नोंदविल्या जाणार आहेत, असे सरकारी वकील अँड. प्रसाद सोईतकर यांनी सांगितले.