आधुनिक तंत्रज्ञान गावांपर्यंत पोहोचवू - नितीन गडकरी

January 12,2021

नागपूर : १२ जानेवारी -  ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी एक गाय, एक कडूनिंबाचे झाड आणि एक परिवार या आधारावर नवीन अर्थव्यवस्था उभी करून सर्व आधुनिक तंत्रज्ञान गावांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. यामुळेच ग्रामीण आणि मागासलेल्या भागाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढून देशाची प्रगती होईल, हाच आत्मनिर्भरतेचा मार्ग असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. 

खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे गायीच्या शेणापासून निर्माण करण्यात आलेल्या इमल्शन आणि डिस्टेंपर पेंटचा शुभारंभ आज नवी दिल्लीत नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय पशुपालन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज qसग, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी, खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना व अन्य उपस्थित होते. याप्रसंगी नितीन गडकरी यांनी कृषी, ग्रामीण, आदिवासी आणि मागासलेल्या भागाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना म्हटले की, मागासलेल्या मागाचा सामाजिक, आर्थिक विकास हेच आत्मनिर्भरतेकडे जाणारे पाऊल आहे. 

तीस टक्के लोक ग्रामीण भारताकडून शहरी भारताकडे का गेले, याचा विचार केला तर लक्षात येते की रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध न झाल्यामुळे हे स्थलांतर झाले आहे. आता ग्रामीण आणि कृषी, मागासलेला भागात रोजगार निर्मिती करून शहरी भागाचे ग्रामीण भागाकडे स्थलांतर करणे क्रमप्राप्त आहे, हे संभव होऊ शकते. गरिबी निर्मूलन ही आमची मोहीम आहे. ग्रामोद्योग आणि कृषी उद्योगांना प्रोत्साहन देणे, राजकारणाचा सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी उपयोग करून हा बदल शक्य आहे. पुन्हा लोक शहरांकडून गावांकडे परततील, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.