‘आपली मेट्रो’ मध्ये झाला 'शेगांवीचा महायोगी' चा मुहूर्त अभिनव प्रयोगाला उपस्थितांची पसंती

January 01,2021

नागपूर, 1 जानेवारी : श्री गजानन महाराज वायू गतीने एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचायचे असे म्हणतात. ‘आपली मेट्रो’ नेही हाच अनुभव ‘शेगांवीचा महायोगी’ या श्री गजानन महाराज यांच्यावर आधारित नाटकाच्या मुहूर्ताच्या’  निमित्ताने उपस्थितांना दिला. धावत्या मेट्रोमध्ये मान्यवरांच्या हस्ते श्री नटराजाचे पूजन करण्यात आले. राधिका क्रिएशन्स निर्मित व रंजन कला मंदिर, नागपूरच्या सौजन्याने दोन अंकी नाटक 'शेगांवीचा महायोगी' चे लागोपाठ तीन  प्रयोग येत्या, 9 व 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने धावत्या ‘आपली मेट्रो’ मध्ये या नाटकाचा अभिनव पद्धतीने नववर्षाच्या प्रारंभी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते शुक्रवारी मुहूर्त करण्यात आला.  याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आशिष लोबो, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर विलास पराते, नाटकाचे निर्मिती सूत्रधार अरुणा पुरोहित, निलिमा बावणे, डॉ. रवी गि-हे, दत्ता फडणवीस, सारिका पेंडसे, शैलजा पिंगळे यांच्यासह दिग्‍दर्शक  संजय पेंडसे, मार्गदर्शक डॉ. जयंत वेलणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विष्णू मनोहर यांनी ‘आपली मेट्रो’ मध्ये मुहूर्त करण्याच्या अभिनव कल्‍पनेचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. जयंत वेलणकर यांनी गजानन महाराजांच्या भक्तांना  आलेल्या सुमारे दीडशे अनुभूतींचे संकलन केले असून त्यातीलच एका अनुभूतीवर ही नाटक आधारित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संजय पेंडसे यांनी, कोरोनामुळे नाटकाचे प्रयोग लांबले होते. परंतु, आता याचे भारतभर 101 प्रयोग  करण्याचा मानस असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. रवी गि-हे यांनी केले.

शेगांवीचा महायोगी चे लागोपाठ तीन प्रयोग

राधिका क्रिएशन्स निर्मित व रंजन कला मंदिर, नागपूरच्या सौजन्याने दोन अंकी नाटक  शेगांवीचा महायोगी  चे येत्या, 9 व 10 जानेवारी रोजी तीन प्रयोग होणार आहेत. 9 जानेवारीचा प्रयोग रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात सायकाळी 5 वाजता तर 10 जानेवारीचे दोन प्रयोग

सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी 2 वाजता व सायंकाळी 5 वाजता होतील.

नाटकाचे लेखक उदयन ब्रह्म हे असून दिग्‍दर्शक संजय पेंडसे आहेत. डॉ. जयंत वेलणकर मार्गदर्शक आहेत. या नाटकाचे निर्मिती सूत्रधार अरुणा पुरोहित, निलिमा बावणे, डॉ. रवी गि-हे, दत्ता फडणवीस, सारिका पेंडसे व शैलजा पिंगळे हे  आहेत. नेपथ्‍य सतीश पेंडसे यांचे असून प्रकाश योजना किशोर बत्तासे यांची आहे. संगीत आभास पेंढारी यांनी दिले असून रंगभूषा बाबा खिरेकर यांनी सांभाळली आहे. गजानन महाराजांच्या भूमिकेत बहुरंगी कलाकार अनिल पालकर  आहेत. सीमा सायरे, दत्ता फडणवीस, मिनाक्षी भावे, स्वप्नील जतकर, डॉ. रवी गि-हे, डॉ. रेणुका जांभोरकर, रित्विका तुंबडे, प्रबोधिनी चिपळूणकर यांच्याही यात भूमिका आहेत. चेतन अहिरे, क्षीतिज भोगे, मंगला जोशी, रौनक पळसापुरे व  श्रुती सूर्यवंशी यांचे निर्मिती सहाय्य लाभत आहे. नाटकाच्या प्रवेशिका सभागृहात उपलब्ध राहणार आहेत. शिवाय, सारिका पेंडसे (9422113232), डॉ. रवी गि-हे (9850396080) व दत्ता फडणवीस (9890261907) यांच्याशीही संपर्क साधता  येईल.