१२वीच्या ऑनलाईन अर्जात हिंदू धर्माचा उल्लेखच नाही

December 03,2020

नागपूर : ३ डिसेंबर - शिक्षण क्षेत्र सर्वांसाठी खुले असावे, त्यात कोणताही भेदभाव नसावा, असे सर्वत्र बोलले जाते. पण. ‘तळे राखी तो पाणी चाखी’ या न्यायाने सरकार बदलले की धोरण बदलते, याचा प्रत्यय शिक्षण विभागाने बारावी परीक्षा अर्जातून आला. परीक्षा अर्जातील धर्माच्या रकान्यात सर्व धर्मांचा उल्लेख स्वतंत्रपणे आहे, पण त्यातून हिंदू धर्माला वगळण्यात आल्याचे दिसून येत आहे. बहुतांश विद्यार्थी, पालक हा फॉर्म भरतात पण कुणीही याकडे लक्ष दिलेले नाही, या दुर्लक्षित स्वभावामुळे सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे हस्तक असलेल्या प्रशासकीय अधिकार्याचे फावते व त्यातून सातत्याने असे प्रकार घडत असतात.

सर्वधर्म समभावाची शिकवण, विविधतेत एकता आणि धार्मिक सहिष्णूता ही भारताची वैशिष्ट्ये सर्वश्रुत आहेत. या गुणांमुळे भारतीय लोकशाहीदेखील समृद्ध झाली. पण, राजकीय पक्षांनी शिक्षण क्षेत्रातदेखील आपल्या कोत्या मनोवृत्तीचा परिचय देत कुणाचे लक्ष नाही, असे पाहून आभासी (ऑनलाईन) तसेच ऑफलाईन अर्जात असा विकृत बदल केला.

 बारावीच्या परीक्षेसाठी सध्या आभासी अर्ज सादर करण्यात येत आहे. आजवर याच नेत्यांनी आपल्या मुलांसाठी हे फॉर्म भऱले, त्यात धर्माच्या रकान्यात सर्व धर्मांचा उल्लेख होता, तसा तो अजूनही आहे. पण, आता त्यातून हिंदू हा शब्द वगळण्यात आला आणि हिंदू धर्माचा उल्लेख न करता हिंदू विद्यार्थ्यांना आपला धर्म शब्दात न लिहिता गैर अल्पसं‘यांक (नॉन-मायनॉरिटी) या रकान्यातील ‘शून्य’ असा कोड टाकण्यास सांगण्यात आले आहे. 

या परीक्षा अर्जात सर्व धर्माचा उल्लेख वगळून केवळ अल्पसंख्याक आणि गैर अल्पसंख्याक असे दोन गट केले असते तरी समजू शकत होते. पण, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी, जैन, शिख आदी धर्मांचा उल्लेख आहे. केवळ हिंदू धर्माचा उल्लेख वगळण्यात आला आणि या धर्माला थेट गैर अल्पसं‘यांक गटात टाकून त्याची मूळ ओळख पुसण्याचा प्रयत्न यातून जाणवत आहे. 

प्रत्येक ठिकाणी धर्माचा उल्लेख असलाच पाहिजे, असे कुणाचेही म्हणणे नाही. पण, असल्यास तो सर्वांचा असावा आणि नसल्यास कुणाचाच नसावा, असे धोरण असणे अपेक्षित आहे. यातही विद्यार्थ्यांमध्ये असे भेदभावात्मक प्रकार रुजविण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते. याच छुप्या अजेंड्यातून सरकारने यापूर्वी गुणवत्ता यादी बंद करण्याचा प्रकार केला, निकालाचे गॅझेट देणे बंद केले. मुख्य म्हणजे या प्रकारात निर्णय घेणार्या पक्षांचा हेतू साध्य झाला.