पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या तरुणाला समजावत केले आत्महत्येपासून परावृत्त

December 03,2020

नागपूर : ३ डिसेंबर - घरगुती भांडणामुळे दारूच्या नशेत गांधीसागर तलावात आत्महत्या करायला गेलेल्या इसमाचा गणेशपेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला. चेतन ऊर्फ दुरेन वर्मा असे इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, चेतन यांच्या अंबाझरी फवारा चौक येथे चहा-नाश्त्याचे दुकान आहे. आई, वडील, पत्नी आणि दोन मुलांसह तो राहतो. त्याला दारूचे प्रचंड व्यसन आहे. त्यामुळे त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्याला नेहमी दारू न पिण्यासाठी समजवित होते. पण, दारूच्या आहारी गेलेला चेतन त्यांना जुमानत नव्हता. दारूच्या व्यसनामुळे त्याचे घरच्यांशी आणि मित्रांशी नेहमीच भांडण होत असे. सोमवारीही त्याच्या दारूच्या व्यसनामुळे त्याचे घरी भांडण झाले. 

घरच्यांनी त्याचा मित्र नीलेश गडेकर याला याबाबत माहिती दिली आणि त्याला समजवायला सांगितले. नीलेशने त्याला भेटून खूप समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारू सोडायची इच्छा नसलेल्या चेतनने नीलेशसोबतही खूप भांडण केले. त्यानंतर तो पुन्हा दारू पिऊन रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी गांधीसागर तलावाजवळ आला. त्यावेळी गणेशपेठ पोलिस ठाण्याचे पथक रात्र गस्तीवर होते. त्यांना एक इसम तलावाच्या कठड्याजवळ जाताना दिसला. त्यांना शंका आल्याने त्यांनी त्याच्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण, तोवर चेतन तलावाचे कठडे पार करून तलावाच्या काठावर पोहोचला होता. पोलिस पथकाने लगबगीने कारवाई करीत त्याला तेथून खेचून आणले. पूर्णपणे दारूच्या नश्ेात असलेल्या चेतनला त्याच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.