संजय निरुपम यांचे शिवसेना आणि भाजपला खडे बोल

December 03,2020

मुंबई : ३ डिसेंबर - बॉलिवूड मुंबईतून उत्तर प्रदेशात हलविण्याच्या हेतूने चाचपणी करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याचे बोलले जात आहे. आदित्यनाथ यांच्या या दौर्यावर शिवसेनेकडून टीका होत असताना आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही या वादात उडी घेतली आहे. सिनेप्रेमींनी आपल्या कष्टाने बॉलिवूडचा विराट विश्व इथे निर्माण केले असून त्यासाठी तब्बल १00 वर्ष खर्ची झाली आहेत. त्यामुळे नेत्यांनी बॉलिवूड शिफ्ट करण्याच्या किंवा बॉलिवूडला वाचवण्याच्या वल्गना करू नये, असे ट्विट करत निरुपम यांनी शिवसेना आणि भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

बॉलिवूडला कुणीच कुठे घेऊन जाऊ शकत नाही आणि बॉलिवूडला कोणत्याही राजकीय पक्षाच्या संरक्षणाची गरजही नसल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली होती.

उत्तर प्रदेशात फिल्मसिटी निर्माण करण्याची तयारी आदित्यनाथ यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांची अक्षय कुमारसोबत चर्चा झाली. त्यानंतर ते काही दिग्दर्शकांची देखील भेट घेणार असल्याचे कळते. आदित्यनाथ यांच्या या दौर्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. योगींनी मुंबईशीच पंगा घेतलाय का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.