एसटी ला राज्य शासनाचे १ हजार कोटींचे विशेष अर्थसहाय्य

December 03,2020

मुंबई : ३ डिसेंबर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. कोविड-१९ च्या टाळेबंदीमुळे एस टी महामंडळाची वाहतूक व्यवस्था बंद होती. त्यामुळे कर्मचार्यांच्या वेतनासाठी महामंडळास राज्य शासनाकडून १000 हजार कोटींचे विशेष अर्थसहाय्याला मंजुरी दिली आहे. यामुळे एसटी कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विधानमंडळाचे यंदाचे २0२0 चे चौथे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार असल्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथे अतिविशेषोपचार रुग्णालयात प्रथम टप्प्यांकरिता आवश्यक ८८८ पदांच्या निर्मितीसाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेस राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशा वस्ती-वाड्यांना आता नवीन नावे देण्यात येतील. राज्यात अनेक शहरात कुंभार वाडा, तेली पूरा, बारी पुरा, चांभार वाडा, ब्राह्मण आळी, सुतार गल्ली, सोनार वाडा, गवळी चाळ आदी नावे वस्त्यांना देण्यात आली आहेत. जातीच्या या खुणा पुसून टाकण्याऐवजी त्या वषार्नुवर्षे त्या जपल्या जात आहेत. विशेष म्हणजे एकविसाव्या शतकात या वस्त्यांची सरकारी रेकॉर्डवरील नोंदही तशीच आहे. त्यामुळे समाजात जातीय सलोखा, त्याबरोबर एकीची भावना निर्माण होण्यास अडथळा येत आहे.