शेतकरी आंदोलनाला मराठीतील दिग्गज साहित्यिकांचा पाठिंबा

December 03,2020

मुंबई : ३ डिसेंबर - गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांना आता मराठीतील दिग्गज साहित्यिकांनीही पाठींबा दर्शवला आहे. सरकारकडून अमानुषपणे शेतकर्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या साहित्यिकांनी केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक महेश एचकुंचवार, वसंत आबाजी डहाके, रा. रं. बोराडे आणि आसाराम लोमटे आदींनी शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. 

मराठी साहित्यिकांची भूमिका मांडताना साहित्यिक आसाराम लोमटे म्हणाले, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जे तीन कृषी कायदे अंमलात आणले आहेत. त्या कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकर्यांमध्ये जबरदस्त उठावाची भावना निर्माण झाली आहे. सगळे शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीत एकवटले आहेत. सुरुवातीला या आंदोलनकर्त्या शेतकर्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. कडाक्याच्या थंडीत सुद्धा त्यांच्यावर पाण्याचे फवारे, अर्शुधूरांच्या नळकांड्या आणि लाठी हल्ला या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि अत्यंत अमानुषपणे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केला. तरी निधार्राच्या जोरावर हे सर्व शेतकरी आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत.

मुळात देशभरातील शेतकर्यांच्या मतांचा विचार न करता आणि त्यांना विश्वासात न घेता ही विधेयकं केंद्र सरकारनं मंजूर केली आहेत. या कायद्याच्या माध्यमातून करार शेतीद्वारे बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर र्शम करणारा, गुजराण करणारा जो शेतकरी आहे, तो हद्दपार होईल अशी शेतकर्यांची भावना आहे. यामध्ये कोरडवाहू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकर्यांमध्ये शेतमालाच्या हमीभावाचे कवच गळून पडेल अशी भावना आहे. शेतकर्यांच्या या भावनेकडे साफ दुर्लक्ष करुन सत्तेच्या बळावर शेतकर्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणं ही बाब अतिशय अमानुष आहे. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून शेतकर्यांचा असंतोष खदखदतोय. या काळात शेतकर्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी सुद्धा या सरकारने पार पाडलेली नाही, असेही लोमटे यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत लिहिणार्यांनी शेतकर्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. महाराष्ट्रातून विशेषत: शेतीच्या शोषणव्यवस्थेची मांडणी करणार्या महात्मा ज्योतिराव फुले ते क्रांतीसिंह नाना पाटलांपयर्ंत अनेक धुरिणांनी याच मातीतून शेतकर्यांच्या प्रश्नांवर लढे दिले. त्यामुळे आज दिल्लीत ठामपणे उभ्या असलेल्या शेतकर्याच्या पाठीशी आपण उभं असलंच पाहिजे आणि ते आम्ही आमचे कर्तव्य समजतो, अशी भूमिका साहित्यिक आसाराम लोमटे यांनी पाठिंबा देणार्या साहित्यिकांच्यावतीनं मांडली.