घरफोडी करणारे दोन आरोपी अटकेत

December 03,2020

वाशीम : ३ डिसेंबर - वाशीम शहरात भरदिवसा घरफोडी करणार्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पदभार स्वीकारल्यापासून मालमत्तेचे उघड न झालेले गुन्हे उघड करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली. सिव्हिल लाईन, अग्रवाल ले आऊट येथील रहिवासी केशव नामदेव भिसळे यांनी 29 सप्टेंबर 2019 रोजी घरफोडीबाबत फिर्याद दिली होती. त्यावरुन वाशीम शहर पोस्टेला गुन्हा दाखल केला.

या घरफोडीचा तपास लावण्यासाठी वाशीम शहर पोलिस व स्थागुशा अधिकारी व कर्मचारी यांनी गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आणण्याच्या प्रयत्नात असतांनाच 29 नोही रोजी स्थागुशा चे पोनि शिवाजी ठाकरे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे यातील आरोपी विक्की उर्फ महादेव श्रीकृष्ण कान्हेकर (वय 25) व विशाल प्रल्हाद भिसे (वय 23) दोन्ही रा. शेगाव जि बुलढाणा यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले. त्यावरुन स्थागुशा चे तपास पथक सपोनि मोहनकर, वाढवे, पोउपनि पठाण, सफौ गावंडे, पोना सुनिल पवार, प्रशांत राजगुरु, अमोल इंगोले, राजेश राठोड, पोशि अश्विन जाधव, राजु गिरी हे क्षणाचाही विलंब न करता आरोपीतांच्या मागावर रवाना झाले. उपरोक्त आरोपी हे मोटारसायकलने शेगाववरुन अकोला येथे जाणार असल्याचे समजल्याने तपास पथकाने शेगाव अकोला रोडवर मोक्याच्या ठिकाणी सापळा रचून नमुद दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता नमुद गुन्हा त्यांनी त्यांचे साथिदारासह केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.