खासगी बस आणि टिप्पाच्या अपघातात चालक आणि वाहक जागीच ठार

December 03,2020

यवतमाळ : ३ डिसेंबर - कोरोना टाळेबंदीत आपल्या गावी परत गेलेल्या मजुरांना उत्तरप्रदेशहून चेन्नई येथे घेऊन जाणार्या खाजगी प्रवासी बसने टिप्परला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पांढरकवडा शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग 44 वरील कशीश हॉटेलसमोर घडली.

ट्रॅव्हल  यूपी83 बीटी7831 ही बस हॉटेलमध्ये काम करणार्या नेपाळी मजुरांना घेऊन कानपूरजवळून दोन दिवसांपूर्वी निघाली होती. बुधवार, 2 डिसेंबरला सकाळी 10.30 च्या सुमारास पांढरकवडानजीक चालक शिवकुमार राजरतन (वय 35, रा. बाराऊर, जि. कानपूर, उत्तरप्रदेश) याने अत्यंत निष्काळजीपणे आपली गाडी चालवीत रस्त्याच्या बाजूस उभ्या नादुरुस्त टिप्पर क‘मांक एमएच40 एन0259 ला जोरदार धडक दिल्याने गाडीची समोरील बाजू उद्ध्वस्त झाली.

 त्यात शिवकुमार राजरतन जागीच ठार झाला. तर वाहक सिराजखान शहजादखान (वय 35) याच्या गळ्यास मोठी जखम होऊन रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे त्यास उपस्थित लोकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अतिरिक्त चालक रामचंद्र पासवान यालाही प्रचंड मार बसला. त्यास स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गंभीर अवस्थेत यवतमाळ येथे हलविण्यात आले असून त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे. 

या बसमधील इतर कामगारांना कमी अधिक प्रमाणात इजा झाली होती. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांना काढण्यासाठी क‘ेनचा उपयोग करावा लागला. अपघातानंतर काही वेळ राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता. गाडीतील मृतदेह काढण्यासाठीही क‘ेनची मदत घ्यावी लागली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती पांढरकवडा आणि महामार्ग पोलिस यांनी लगेच घटनास्थळ गाठून रस्ता मोकळा करून जखमींना उपचारासाठी रवाना केले.