घराबाहेर निघालेल्या महिलेवर हल्ला करून वाघाने केले ठार

December 03,2020

चंद्रपूर : ३ डिसेंबर - केरकचरा बाहेर टाकण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरूवार, 3 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्या डोर्ली(चिचगाव) येथे घडली. तारा विश्वनाथ खरकाटे असे मृतक महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती वनाधिकार्यांना मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाघाचा तातडीने बंदोबस्त करा, जंगलव्याप्त गावाशेजारील झाडेझुडपी तोडून परिसर स्वच्छ करा, मृतक कुटुंबियांच्या वारश्यास आर्थिक मदत द्या अशी मागणी गावकऱ्यांनी रेटून धरली. त्यामुळे काही काळ घटनास्थळावर तणाव होता.

 दरम्यान, जमावाला पांगविण्यासाठी ब्रम्हपुरी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जमावाला शांत केले. वनाधिकार्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केल्यानंतर तणाव निवळला. घटनास्थळी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मल्लिकाअर्जून इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी पुनम ब्राम्हणे, क्षेत्र सहाय्यक सुर्यवंशी, सुशांत उराडे, प्रकाश कावळे, पवन डाखरे, चंदू कांबळे आदींची उपस्थिती होती.