मेळघाटात आदिवासींची सेवा करणारे कोल्हे दाम्पत्य उद्या कौन बनेगा करोडपतीमध्ये

December 03,2020

अमरावती : ३ डिसेंबर - मागील तीन वर्षापासून मेळघाटच्या दुर्गम गावात राहून आगळ्या वेगळ्या प्रकारे आदिवासींची सेवा करणारे पद्मश्री डॉ. रवी तथा स्मिता कोल्हे यांचेवर निर्मित केबीसीचा कर्मवीर एपिसोड शुक्रवारी सोनी टिव्हीवर रात्री 9 वाजता दिसणार असल्याने संपूर्ण विदर्भाची उत्कंठा शिगेवर पोहचलेली आहे.

 महानायक अमिताभ बच्चनच्या समोर बसून त्यांच्या घुमावदार प्रश्नांची उत्तरे देणे जीवनातील एक यादगार क्षण अनुभवाला आलेला आहे, असे स्मिता कोल्हे म्हणाल्या. पद्मश्री पुरस्कृत झाल्यापासून डॉ. रवी व स्मिता कोल्हे यांना राष्ट्रीय स्तरावर एक आगळी वेगळी लोकप्रियता प्राप्त झालेली आहे. एके दिवशी त्यांना हॅलो मै केबीसी से बोल रहा हू असा भारदस्त आवाज मोबाईलवर आला. गेल्या महिन्यात बैरागड, धारणी तथा कोलुपूर येथे केबीसीच्या चमूने तीन दिवस मुक्कामी राहून चित्रिकरण केले. यानंतर मुंबईत कर्मवीर विशेष एपिसोडचे चित्रीकरण झाले. आता शुक्रवारी रात्री 9 वाजता रवी व स्मिता कोल्हे अमिताभ बच्चन यांचे समोर बसून खेळणार आहेत. तर या माध्यमाने मेळघाटच्या समस्या व त्यावर उपाययोजना सुध्दा जगासमोर मांडतील. कर्मवीर पाहण्यासाठी अमरावती जिल्हा व विदर्भासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. मेळघाटातील केबीसीत पोहचणारे कोल्हे दाम्पत्य हे दुसरे आहे, हे विशेष.