दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने चाकूने वार करून केली हत्या

December 03,2020

अमरावती : ३ डिसेंबर - दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे तिघांनी एका 43 वर्षीय व्यक्तीची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची घटना रात्री घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. सुधाकर भिमराव भुरमूंदे (वय 43 वर्ष रा. शिरजगाव कसबा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सदानंद धाकडे, विजय मंडलिया व आकाश धाकडे यांना हत्येचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. रात्री उपरोक्त तीन आरोपींनी भाजीपाला आणण्यासाठी जात असलेल्या सुधाकर यांना थांबविले. त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. पैसे देण्यास सुधाकर यांनी नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या आकाश धाकडे व अन्य दोन सहकार्यांनी सुधाकर यांना पकडले व आकाश याने चाकूने सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर हे तिघेही पळून गेले. घटना इतरांच्या लक्षात आल्यानंतर सुधाकर यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृतघोषीत केले. या प्रकरणी पोलिसांनी कलम 302, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अचलपुर व ठाणेदार शिरजगाव कसबा यांनी भेट दिली. अवघ्या 24 तासात पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणेदार सचिनसिंग परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि मनोज सुरवाडे अधिक तपास करीत आहे.