कत्तलीसाठी नेली जाणारी २८ जनावरे आणि वाहन जप्त

December 03,2020

गडचिरोली : ३ डिसेंबर - आष्टीमार्गे ट्रकमधून तेलंगाणा राज्यात कत्तीसाठी घेऊन जाणार्या २८ जनावरांसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई  सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास आष्टी-आलापल्ली मार्गावरील एमजेएफ महाविद्यालयासमोर आष्टी पोलिसांनी पार पाडली. याप्रकरणी ट्रकचालक श्रीनू दमसिंग वर्त्यावत (३८), क्लिनर शिवा रामसिंग जाटावत (३0) दोन्ही रा. मोदमपल्ली ता. शहादनगर जि. मेहबुबनगर (तेलंगाणा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

प्राप्त माहितीनुसार नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील श्रीकृष्ण गौरक्षण सेवा समितीचे अध्यक्ष सुरेश दुर्गे चंद्रपुर येथून आपल्या कारने आष्टी मार्गे आलापल्लीकडे जात होते. दरम्यान आष्टी येथील एमजेएफ महाविद्यालयासमोर सकाळच्या सुमारास आष्टीकडून आलापल्लीकडे जाणार्या अशोक लेलॅंड कंपनीच्या मालवाहु ट्रक क्र. टीएस १२ युसी ९९३0 हे वाहन ताडपत्रीने झाकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांना संशय आला. त्यांनी ट्रकचा पाठलाग करीत वाहनास थांबविले. ट्रकची तपासणी केली असता २८ जनावरे आढळून आली. याची माहिती आष्टी पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी मौका चौकशी केली. यात एका जनावराची किंमत १0 हजार प्रमाणे एकूण २ लाख ८0 हजार रुपये किंमतीच्या जनावरे तर जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला १५ लाख रुपये किंमतीचे ट्रक असा एकूण १७ लाख ८0 हजाराचा रुपयाचा माल जप्त करण्यात आला.

सदर २८ जनावरे ट्रकमध्ये कोंबलेल्या अवस्थेत होती. याबाबत ट्रक चालकाला विचारणा केली असता त्यांच्याकडे जनावरे वाहून नेण्याची कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाही. सुरेश दुर्गे यांच्या तक्रारीनुसार आष्टी पोलिसांनी ट्रकचालक व क्लिनर यांना ताब्यात घेतले असून दोघंसह ट्रक मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत.