घ्या समजून राजे हो - डॉ. शीतल आमटे करजगी यांची आत्महत्या.... सखोल चौकशी व्हायलाच हवी....

December 03,2020

सोमवार दि. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास कुष्ठरोग्यांचे पुर्नवसन करणार्‍या आनंदवन या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे करजगी यांनी आत्महत्या केल्याची बातमी कानावर आली. डॉ. शीतल आमटे या  आनंदवनचे संस्थापक असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांच्या नात होत्या. तर विख्यात समाजसेवक डॉ. विकास आमटे यांच्या कन्या होत्या. आमटे परिवाराभोवती असलेले लोकप्रियतेचे वलय लक्षात घेता ही  बातमी खळबळजनक ठरणे अपरिहार्य होते. अशी ती खळबळजनक ठरलीही. ही घटना घडून आज दोन दिवस उलटलेले आहेत. मात्र डॉ. शीतल यांनी आत्महत्या का केली याचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. या विषयावर माध्यमांमध्ये  आणि समाजमाध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातून विविध प्रश्‍नही निर्माण होत आहेत.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध दैनिकाने दोन दिवस लागोपाठ आनंदवनबद्दल बातम्या छापल्या होत्या. या बातम्यांमध्ये आनंदनवन परिसरात असलेला कथित असंतोष पुढे आणत या सर्वच प्रकारचा केंद्रबिंदू म्हणून डॉ. शीतल  यांचेच नाव घेतले गेले होते. त्यानंतर सुमारे दहा दिवसांपूर्वी डॉ. शीतल यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यात आनंदवन मधल्या आणि आमटे परिवारातल्या महत्त्वपूर्ण व्यक्तींवर थेट आरोप करण्यात आले होते. हा  व्हिडिओ अपलोड केल्यावर तासाभरातच व्हिडिओ काढूनही घेतला गेला. नंतर आपल्याला हा व्हिडिओ कुणाच्यातरी दबावात काढावा लागला असा खुलासा डॉ. शीतल यांनी एका न्यूज पोर्टेलला केला असल्याचीही बातमी पुढे आली.  त्यानंतर आनंदवनचे आणि आनंदवनचे संचालन करणार्‍या महारोगी सेवा समितीचे प्रमुख विश्‍वस्त असलेले डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे तसेच डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे (शीतलचे आई-वडील) यांनी समाजमाध्यमांवर  एक पत्र प्रसारित केले होते. या पत्रात त्यांनी डॉ. शीतल यांनी केलेले सर्व आरोप खोडून काढत शीतल नैराश्याच्या गर्तेत असल्यामुळे तिने हे आरोप केले असल्याचा दावा केला होता. त्यानंतर लगेचच थोड्या दिवसात शीतलच्या आत्महत्येचीच  बातमी आली.

डॉ. शीतल आमटे करजगी ही जेमतेम 39 वर्षाची तरुणीच म्हणावी लागेल अशी होती. उच्चविद्याविभूषित होती. तिच्या नावामागे परिवाराचे वलय होते. तिचा पती गौतम करजगी हा देखील उच्चविद्याविभूषित आणि कार्पोरेट जगतातील  वजनदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखला गेला होता. त्यांच्या संसारावेलीवर शर्विल नावाचे सुंदरसे पुष्पही उमलले होते. तरीही सवर्र्काही सोडून शीतलने आत्महत्या का करावी हा प्रश्‍न माझ्यासारख्या अनेकांना केल्या 48 तासापासून  भेडसावतो आहे. शीतलला मी अगदी तान्ही असतानापासून बघितले होते. त्या काळात एक पत्रकार या नात्याने मी आनंदवनात नियमित जात असे. 1982 सालच्या आनंदवनच्या मित्र मेळाव्याला मी गेलो असताना तान्ही शीतल साधनाताई  आमटेंच्या मांडीवर होती. मी ताईंना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला बोलावून अविनाश हे बघ विकासचे शेंडेफळ म्हणून माझी ओळख करून दिली होती. त्यावेळी आनंदवनचाच एक भाग असलेल्या उत्तरायण या ज्येष्ठ नागरिकांच्या  निवासस्थानी असलेल्या सर्व आजी आजोबांच्या अंगाखाद्यांवर खेळत शीतल लहानाची मोठी झाली. लहानपणी तिच्या पायात काही व्याधी होती. मात्र या डॉक्टरमंडळींनी ती व्याधी दुरुस्त करून शीतलला दोन पायावर उभे केले. शीतल  वरोर्‍याच्या शाळेत शिकली आणि नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतल्यावर ती आनंदवनासाठीच सर्वस्व झोकून देत कार्यरत झाली. या दरम्यान तिला गौतम करजगी भेटला. मान्यवरांच्या उपस्थितीतच आनंदवनात तिचा  विवाहसोहळा संपन्न झाला. बाबा गेले तेव्हा मी आनंदवनला गेलो होतो. त्या दिवशीही माझी शीतलची भेट झाली होती. 2016 मध्ये रोटरीच्या एक प्रकल्पासाठी मी आनंदवनला गेलो असतानाही कौस्तुभ, पल्लवी यांच्यासोबतच शीतल, गौतम  या सर्वांचीच भेट झाली होती. त्या दिवशी विकास आणि भारती वहिनींशी भरपूर गप्पाही झाल्या. नंतर अधूनमधून शीतलशी फोनवर बोलणे व्हायचेही. मात्र या संपूर्ण प्रवासात मी जी काही शीतल बघितली ती एक सकारात्मक विचार करणारी  आणि जगाच्या कल्याणासाठी सर्वस्व झोकून देणारी अशीच शीतल मी बघितली आणि अनुभवलीही.

गेल्या काही वर्षांपासून आमटे परिवाराची तिसरी पिढी समाजकार्यात सक्रिय झाली होती. विकास आणि प्रकाशने या सर्वांना कामे वाटूनच दिली होती. त्यात शीतलकडे आनंदवनची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली  होती. तर गौतमलाही एका प्रकल्पाचा प्रमुख म्हणून नेमले होते. मधल्या काळात शीतलबद्दल आनंदवनच्या कर्मचार्‍यांकडून तक्रारी सुरु झाल्या आणि त्यातून संघर्ष वाढत गेला. याच काळात शीतल आणि तिचा सख्खा भाऊ कौस्तुभ तसेच  वहिनी, पल्लवी यांच्याशी तिचे पटत नाही अशाही बातम्या येऊ लागल्या. त्यातूनच सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका महाराष्ट्रव्यापी प्रमुख वृत्तपत्राने आनंदवनच्या विरोधात एक वृत्तमालिकाच (दोन दिवसांची) प्रकाशित केली. त्यामुळे प्रचंड  खळबळ उडाली. या प्रकारामुळे संपूर्ण आनंदवन तर हादरले होतेच मात्र स्वतः शीतलसुद्धा चांगलीच अस्वस्थ झाली होती. ज्या वृत्तपत्राने शीतलला टार्गेट करत ही लेख मालिका चालविली त्याच वृत्तपत्राने दोन वर्ष आधी शीतलला एक  प्रतिष्ठीत पुरस्कार देऊन गौरवले होते. या प्रकाराने अस्वस्थ झालेल्या शीतलने त्या वृत्तपत्राच्या संपादकांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त तर केलीच पण दिलेला पुरस्कारही परत करत असल्याचे सांगितले होते. नंतर थोडे वातावरण  निवळते आहे असे वाटत असतानाच सुमारे दहा दिवसापूर्वी तो व्हिडिओ फेजबुकवर आला आणि तिथूनच या गडबडीला सुरुवात झाली असावी.

शीतलने आत्महत्या का केली याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. आनंदवनचे व्यवस्थापन सांभाळत असताना तिने आनंदवन हे स्मार्ट व्हिलेज बनवावे असे स्वप्न बघितले होते. त्यात कार्पोरेट कल्चरचा पुरस्सरकर्ता असलेला तिचा  नवरा गौतम याचाही सहभाग होता. मात्र तिची आणि गौतमची कार्पोरेट कार्यपद्धती आनंदवनमधल्या बाबा आणि ताईंच्या तालमीत तयार झालेल्या रहिवाश्यांना रुचली नसावी आणि त्यातूनच संघर्ष निर्माण झाला असावा असे बोलले  जाते. काहींच्या मते शीतलचा भाऊ कौस्तुभ आणि शीतलमध्ये वर्चस्वावरून वाद होते असेही सांगितले गेले. काल समाजमाध्यमांवर काहींनी आनंदवनच्या मालमत्तेवर काही धनदांडग्यांचा डोळा असून ही जागा टूरिस्ट स्पॉट म्हणून विकसित  करण्यासाठी काहीशे कोटींना विकत मागितली गेली अशाही आशयाची माहिती झळकली. काहींच्या मते सुमारे तीन महिन्यांपूर्वी वृत्तपत्रातून आलेल्या वृत्तमालिकेमुळे शीतल अस्वस्थ झाली आणि त्यातूनच तिने आत्महत्या केली असेही  सांगितले गेले. या संदर्भात वेगवेगळे तर्ककुतर्क लावले जात आहेत मात्र वास्तव काय हे अद्याप लक्षात आलेले नाही.

काहींनी समाजमाध्यमांवर या प्रकरणाला आणखी एक वेगळा आयाम देण्याचाही प्रयत्न केला आहे. बाबा आमटे आणि विकास तसेच प्रकाश आमटे यांच्या भोवती असलेल्या वलयाच्या पार्श्‍वभूमीवर पुढच्या पिढीकडे बघितले जात होते.  त्यातून इतरांच्या अपेक्षा पूर्ण करता न आल्यामुळे कुठेतरी हे नैराश्य आले असावे असेही कानावर आले. अजूनही वेगवेगळ्या वदंता कानावर आल्या. मात्र नेमके खरे काय ते कळलेच नाही.

या प्रकरणात आणखी एक मुद्दा समोर आला आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी जी दोन दिवसांची लेख मालिका वृत्तपत्राने प्रकाशित केली त्या वृत्तपत्राला आणि संपादकांना या प्रकारात शीतलच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरले जात आहे. इथे  समाज माध्यमांवर अर्णब गोस्वामी आणि अन्वय नाईक प्रकरणाचा दाखला दिला जातो आहे. ज्याप्रमाणे अन्वय नाईक प्रकरणात त्याला आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून अर्णब गोस्वामीवर गुन्हा दाखल झाला. तसाच या वृत्तपत्राच्या  संपादकावरही आणि संबंधित पत्रकारावर देखील गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होत आहे. यातच आज शीतलच्या सासूबाई सुहासिनी करजगी आणि त्यांचे पती शिरीष करजगी या दोघांचे एक पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे.  त्यात त्यांनी शीतलच्या आत्महत्येबद्दल बरेच मुद्दे उपस्थित केले आहे. आमटे परिवारात त्यांच्या मुलीवरच असा अन्याय होत असेल तर बाकी मुलींचे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर शीतलला मानसिक नैराश्य होते तर ती  इतकी महत्त्वाची जबाबदारी कशी सांभाळू शकली त्याचबरोबर प्रकाश आमटेंना मुक्या प्राण्यांची भाषा समजते तर त्यांना शीतलच्या भावना का समजल्या नाही असे विविध प्रश्‍न उपस्थित करत सर्व आमटे शीतल आणि गौतमच्या विरोधात  काही कटकारस्थान करीत नाहीत ना असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे.

हे सर्वच प्रकार व्यथीत करणारे आहेत. विशेषतः ज्या आनंदवनने गेली सात दशके समाजातल्या तळागळातल्या अपंगांना आपले मानले आणि त्यांचे संगोपन आणि संवर्धन केले त्या परिवारात अशी घटना घडावी आणि असे प्रश्‍न निर्माण केले  जावे हे निश्‍चितच वेदनादायी आहे.

हे सर्व मुद्दे लक्षात घेता या प्रकाराची सखोल चौकशी होऊन नेमक्या वास्तव काय हे समोर आणले जाणे आता गरजेचे झाले आहे. या प्रकरणाची पोलिस चौकशी करीत आहेतच मात्र फक्त पोलिस चौकशीवर न थांबता उच्च स्तरावरून या  प्रकरणाची चौकशी व्हावी आणि नेमके वास्तव काय ते समोर आणले जावे. शीतलला आत्महत्या करण्याची वेळ का आली? त्यासाठी कौटुंबिक कलह कारणीभूत ठरला की बाह्य शक्तींचा हस्तक्षेप? वृत्तपत्रीय हस्तक्षेपही कारणीभूत तर ठरला  नाही ना? गेल्या दोन दिवसांपासून शीतल ही सुपारी पत्रकारितेची बळी असल्याचे बोलले जाते आहे. खरोखर असे काही आहे का हे वास्तवही समोर यायला हवे आणि नेमके वास्तव समोर आल्यावर जे कुणी कारणीभूत ठरले असतील त्यांना  कठोरातली कठोर शिक्षाही व्हायला हवी तरच शीतलच्या आत्म्याला खरी शांतता मिळेल.

शेवटी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, अशा परिवारांमध्ये वर्चस्वावरून संघर्ष निर्माण होणे अशक्य नाही. ज्याप्रमाणे अंबानी परिवारात संघर्ष झालेत त्याचप्रमाणे आमटे परिवारातही झाले असतील. मात्र माध्यमांनी अशा संघर्षाची किती दखल  घ्यावी याचाही विचार केला जाणे गरजेचे आहे. इथे मला मराठीतील ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी सांगितलेला एक किस्सा आठवतो. पर्यटन व्यवसायात कार्यरत असलेल्या एका परिवारात पुढच्या पिढीतील बहीण आणि भावांमध्ये  असाच संघर्ष उभा झाला. या बहीण-भावांच्या वडिलांनी रक्ताचे पाणी करून आपला व्यवसाय उभा केला होता. देशातील प्रमुख पर्यटन व्यावसायिक म्हणून ते ओळखले जात होते. मात्र वडील आपल्यापेक्षा आपल्या भावाला  व्यवसायात जास्त महत्त्व देतात असा बहीणीचा दावा होता. त्यामुळे संतापलेल्या बहीणीने एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला आपले वडील आणि भावाच्या विरोधात संतप्त होत एक खळबळजनक मुलाखत दिली. ही मुलाखत सनसनाटी  निर्माण करणारीच होती. त्यावेळी त्या वृत्तवाहिनीचे संपादक डॉ. निरगुडकर होते. ती मुलाखत बघताच ही प्रसारित करू नका असा निर्णय त्यांनी संबंधित वार्ताहराला दिला. ही मुलाखत आपण प्रसारीत केली नाही तर इतर वाहिन्या प्रसारीत  करतील आणि ब्रेकिंग न्यूज दाखविण्याची आपली संधी जाईल अशी भीतीही त्या वार्ताहराने निरगुडकरांना घातली. निरगुडकर त्या परिवाराला आणि त्या मुलीला चांगले ओळखत होते. त्यांनी त्या मुलीला फोन केला आणि तिला समजावले.  तुझ्या या मुलाखतीमुळे एखाद्या चॅनेलला सनसनाटी बातमी मिळेल पण तुमचा व्यवसाय कोलमडेल. त्यात आज अनेक ग्राहकांनी दिलेला पैसा डुबेल, तुमच्या व्यवसायाच्या जोरावर देशात तुम्ही सुमारे हजार व्यक्तींना रोजगार दिला आहे. ते  सर्व बेरोजगार होतील आणि त्यातून वडिलांचा सूड घेतल्याचे तुला समाधान फक्त मिळेल. बाकी काहीही होणार नाही. त्यापेक्षा तू शांतपणे वडिलांपासून वेगळी हो आणि आजवर घेतलेल्या अनुभवाच्या जोरावर स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय उभा  कर. दोन्ही व्यवसाय भरभराटीत चालू दे. आज माझ्या प्रतिनिधीला दिलेली मुलाखत इतर कोणालाही तू देऊ नकोस अशी समजूत घालून त्यांनी त्या मुलीला शांत केले. त्यानंतर त्या मुलीनेही ऐकून आजवर कोणालाही ती मुलाखत दिली नाही.  निरगुडकरांच्या सल्ल्यानुसार तिने स्वतःचा व्यवसाय उभारला आज वडिलांच्या स्पर्धेत तिचाही व्यवसाय तितक्याचच जोमाने उभा राहिला आहे.

शीतलच्या संदर्भात बातमी मिळाल्यावर संबंधित वृत्तपत्राच्या संपादकांनी संवेदनशीलता दाखवत शीतल संदर्भातील सनसनाटी बातमी थांबवली असती तर आनंदवनची आज होणारी बदनामीही झाली नसती आणि कदाचित शीतलचे प्राणही  वाचू शकले असते.

तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....

-अविनाश पाठक