ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्यामुळे 30 महिला कामगार जखमी

December 01,2020

नागपूर, 1 डिसेंबर : देवालापार जवळील खापा गावामधील रोजमजुरी करणार्‍या कामगारांना घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने झालेल्या अपघातात 30 महिला कामगार जखमी झाल्या. गंबीर अवस्थेत त्यांना उपचारार्थ हलविण्यात  आले. सुदैवाने या अपघातात कोणीही दगावले नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पेंच व्याघ्र प्रकल्पात सिल्लुरी वनविभागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गवत वाढलेले आहे. अंबाखोरी येथे गवतकापणीचे काम मागील आठ दिवसांपासून सुरू  आहे. त्यासाठी खापा येथील महिला ट्रॅक्टर ट्रॉलीतून जात होत्या. मशाल टेक शिवारापासून चालक मनोहर कुंभरे भरधाव वेगाने वाहन चालवीत होता. त्यामुळे ट्रॉली उलटली.

या घटनेची माहिती मिलताच वनपरिक्षेत्राधिकारी मंगेश ताटे घटनास्थली दाखल झाले. सर्व जखमींना तत्काल वनविभागाचा वाहनाने देवलरापार शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी शमीम अख्तर यांच्या  मार्गदर्शनात प्राथमिक उपचार करण्यात आले. जखमी कामगारांमध्ये विमला भलावी, लेखा मसराम, श्यामकला कोवाचे, अंजिरा मरसकोल्हे, विमा कोडवते, माया कोकोडे, संपा वलके, शुभम कुंभरे, सोनी मरसकोल्हे आदींचा यात समावेश  आहे. किरकोळ जखमींना उपचारानंतर सुटी देण्यात आली.