एकनाथ खडसे येत्या दोन दिवसात उडवणार धमाका

November 29,2020

जळगाव : २९ नोव्हेंबर - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक  यांच्यावर ईडीने  कारवाई केल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते आणि माजी एकनाथ खडसे  लवकरच कागदपत्रांसह मोठा खुलासा करण्याच्या तयारीत आहे. 'आपल्याकडे योग्य कागदपत्र आणि पुरावे असून दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार', असं एकनाथ खडसे यांनी जाहीर केले आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्थेत गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणाशी संबंधीत काही महत्त्वाची कागदपत्र, पत्रव्यवहार आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला असल्याचे वृत  दिले आहे.

'या प्रकरणामध्ये बँकेची मालमत्ता ही कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आली आहे, यामध्ये जिल्ह्यातील दिग्गज नेते, आमदार, खासदार आणि माजी मंत्र्याचा सुद्धा समावेश आहे', असंही खडसे यांनी सांगितले आहे.

बीएआर संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी 2018 पासून अनेक वेळा तक्रारी केल्या आहे. या सोबतच खासदार रक्षा खडसे यांच्या लेटरहेडवर देखील दिल्ली इथं अॅड. कीर्ती पाटील यांनी देखील तक्रार केली आहे, असंही खडसे यांनी सांगितले.

राज्य सरकारकडे तक्रार केल्यानंतर सुद्धा सरकारने या प्रकरणाची कारवाईही थांबवली होती, असं सांगत खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले आहे. पण, बीएआर संस्था ही मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा 2002 प्रमाणे संस्थेवर कारवाई करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे, त्यामुळे राज्याचे सहकार आयुक्त कारवाई करू शकत नव्हते, त्यामुळे राज्याने आपला अहवाल पाठवून कारवाई थांबवली होती, असंही खडसे यांचं म्हणणे आहे