शहीद भूषण सतईच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत

November 29,2020

नागपूर : २९ नोव्हेंबर - १३ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात काटोलचे सुपुत्र  भूषण रमेश सतई हे शहीद झाले होते. शहीद भूषण च्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून मदत मिळावी यासाठी अनिल देशमुख यांनी पाठपुरावा केला. नुकत्याच राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शहीद भूषण यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री व काटोल विधानसभेचे आमदार अनिल देशमुख यांनी दिली.

शहीद भूषण सतई हे २०१० मध्ये नायक या पदावर लागले होते. सध्या श्रीनगर येथील गुरेज सेक्टरमध्ये तैनात होते. येथे कार्यरत असतांना त्यांना वीरमरण आले. युद्धात युद्धजन्य परिस्थिती मध्ये तसेच देशातील सर्व क्षेत्रा अंतर्गत सुरक्षा संबंधी मोहिमेत शहीद झालेल्या जवानांना मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. याच निर्णय अंतर्गत शहीद भूषण सतई यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मंजूर व्हावी यासाठी मी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर शहीद भूषण यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

देशासाठी प्राणाची आहुती देवुन शहीद भूषण सतई यांनी आई-वडिलां सोबतच काटोल व  जिल्ह्याची मान उंचावली आहे. शहीद भूषण यांच्या कुटुंबियांना कितीही मदत दिली तरी त्यांच्या कुटुंबावर जे दुःख आले आहे ते कमी होणार नाही. परंतु शहीद भूषण यांनी देशासाठी जे बलिदान दिले त्याचा सन्मान व्हावा यासाठीही मदत कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.