अट्टल चोरट्याला अटक

November 29,2020

अकोला : २९ नोव्हेंबर - चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास खदान पोलिसांनी अटक केली आहे. त्याने तब्बल चार ठिकाणी चोरी केली असून त्याच्याजवळून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सतविर सिंह बलवंत सिंह टांक, असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी चोरीची घटना घडली होती. या घटनेत लाखोंचा मुद्देमाल चोरी गेला होता. या प्रकरणी फिर्याद दाखल झाली होती. या प्रकरणात खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.सी. खंडेराव यांनी विशेष पथकाला तपासासाठी मार्गदर्शन करीत तपासाची सुत्रे वेगाने हलवली. पथकाने अट्टल चोरटा सतवीर सिंह बलवंत सिंह टांक यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. 

पोलिसांनी टांककडून 17 ग्राम सोने, 25 ग्राम चांदी, एक मोबाइल, असा मुद्देमाल जप्त केला आहे. खदान पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांच्या नेतृत्वाखाली दिगंबर अररवराव, रवी डाबेराव, खुशल नेमाडे, राजेंद्र तेलगोटे, शैलेश जाधव यांनी ही कारवाई केली. 

पोलिसांना सतविर सिंहकडून इतरही घरफोडींची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे, त्याने केलेल्या चोरीमध्ये इतर किती जणांचा सहभाग आहे, ते कुठले चोरटे आहेत याचाही तपास पोलीस घेणार आहे. तसेच, त्याने केलेल्या चोरीतील मुद्देमाल हा कुठे विकला याचाही तपास पोलीस करणार आहे.