अपघातात एकाचा मृत्यू

November 29,2020

नागपूर : २९ नोव्हेंबर - गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यांतर्गत येणार्या डवकी गावात दोन दुचाकी एकमेकांना धडकल्याने अपघात घडला आहे. या दुचाकीच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवरी ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कामराज राऊत (४0) हे आपले कामे आटोपून दुचाकीने आपल्या गावाकडे जात होते. ते डवकी या गावाजवळ पोहोचताच विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणार्या मोटारसायकलने त्यांना धडक दिली. धडक इतकी भीषण होती, की या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर विरुद्ध दिशेने येणारा दुचारीस्वार तसेच त्याचा मित्र हे दोघेही गंभीर जखमी झाले. या दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. याघटनेची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मृतदेह साविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. देवरी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.