अमरावती कृषीउत्पन्न बाजार समितीतील व्यापार ठप्प, व्यापारी आणि मजुरांचे भांडण ठरले कारणीभूत

November 25,2020

अमरावती : २५ नोव्हेंबर - अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी आणि मजुरांमध्ये वाद उफाळून आल्याने दोन दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार ठप्प आहे. शेतमाल बाजार समितीत येऊन पडला त्याचे काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. मंगळवारी दिवसभर कृषी उत्पन्न बाजार समितीत गोंधळाचे वातावरण होते.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ व्यापाऱ्यांच्या बाजूने की मजुरांच्या बाजूने असा प्रश्न दोन्ही गटांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळासमोर पेच निर्माण झाला आहे. 

सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत वाद झाला. या वादात परप्रांतीय मजुरांना मारहाण झाल्यावर स्थनिक पाच मजुरांविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणामुळे सोमवारी व्यापाऱ्यांनी काम बंद ठेवले. मजुरांवर अन्याय होतो. परप्रांतीय मजुरांना महत्व दिले जात झाल्याने मंगळवारी काम बंद ठेवले.

सलग दोन दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आल्याने व्यापाऱ्यांनी आजच्या बंदचा निषेध नोंदवला. तर स्थनिक मजुरांनी आमच्यावर होणाऱ्या अन्यायाचे निवारण करा तेव्हाच आम्ही काम सुरू करू अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नाना नागमोते यांच्याकडे केली. अनेक शेतकऱ्यांनी बाजार समिती किती दिवस बंद राहणार असा प्रश्न उपसभापतींना केला. व्यापारी, मजूर व शेतकरी एकाच वेळेस बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयावर धडकल्याने संचालकांच्या दालनात गोंधळ उडाला.