नागपूर विद्यापीठाने केले विद्यार्थ्यांना नापास

November 25,2020

नागपूर : २५ नोव्हेंबर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक वर्षातील विद्यार्थांना प्रोमोट करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले होते. मात्र, नागपूर विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना प्रोमोट करण्याऐवजी चक्क नापास केले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, कोणतीही परीक्षा न घेता नापास कसे करण्यात आले? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यात दीक्षाभूमी महाविद्यालयातील २८ व इतरही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

वाढत्या कोरोनामुळे राज्यातील महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्यात आल्या. यात फक्त अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. मात्र, इतर शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना प्रोमोट करून पुढच्या वर्गासाठी पात्र ठरविण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले होते. असे असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अनेक विद्यार्थांना प्रोमोट करण्याऐवजी नापास करण्यात आले आहे. त्यामुळे, विद्यार्थी सतापले आहेत. परीक्षाच घेण्यात आली नाही, त्यामुळे नापास कोणत्या निकषावरून करण्यात आले? असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत. 

नापास केलेल्यांमध्ये बीए, बी. कॉम, द्वितीय, तृतीय, या सत्रातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही पदवीतील द्वितीय सत्राला असणाऱ्या काही विद्यार्थांना प्रोमोट ऐवजी नापास करण्यात आले होते. त्यामुळे, तेव्हाही विद्यार्थांनी रोष व्यक्त करत कुलगुरूंना गाठले होते. त्यावेळी त्या विद्यार्थ्यांचे निराकरण करण्यात आले होते. मात्र, आता नापास करण्यात आलेल्या विद्यार्थांनी कुलगुरूंना याबाबत कळविले असता त्यांनी महाविद्यालयाकडे बोट दाखविले आहे. त्यामुळे, विद्यार्थी चांगलेच संतापले आहेत. यामुळे पुन्हा एकदा नागपूर विद्यापीठातील गलथान कारभार पुढे आला आहे. 

परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, विद्यार्थ्यांना नापास केल्याने पुढील वर्गात प्रवेश कसा मिळणार, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. या सगळ्या प्रकरणावर विद्यापीठ कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास तयार नसल्याचे दिसून आले. शिवाय या निर्णयाचा चेंडू महाविद्यालयीन स्तरावर टोलावण्यात आला. एकंदरीतच विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या कारभारात विद्यार्थी भरडला जात आहे.