मालमत्ता कर थकीत असलेल्या मालमत्तांचा लिलाव सुरु

November 25,2020

नागपूर : २५ नोव्हेंबर - वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकीत ठेवणाऱ्या स्थावर मालमत्तांवर जप्ती आणून लिलाव करण्याची प्रक्रिया मनपाने सुरू केली आहे. याअंतर्गत आतापर्यंत ६० मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून, या मालमत्तांवर वर्षानुवर्षापासूनची कोट्यवधीची थकबाकी आहे. यातील एक मालमत्तेचा गेल्याच महिन्यात लिलाव झाला. आता यातील २७ मालमत्तांचा ९ डिसेंबरला लिलाव होणार आहे. 

मालमत्ता कर मनपाचा सर्वात मोठा आर्थिक स्रोत आहे. गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता कराचे लक्ष्य गाठण्यात मनपाला अपयश येत आहे. मालमत्ताधारक करच भरत नसल्याने अखेर मनपाला कठोर पावले उचलावी लागतात. त्यानुसार दोनदा नोटीस दिल्यावर मग संबंधित मालमत्तांची जप्ती कारवाई करण्यात येते. त्यानंतर जप्त केलेल्या या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतो. गेल्या महिन्यात लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रतापनगर परिसरातलील एका डुप्लेक्स बंगल्याचा ५७ लाखांत लिलाव करण्यात आला. या मालमत्तेवर ६४ हजारांची अनेक वर्षांपासूनची थकबाकी होती. नोटीस पाठविल्यावरही वृंदा नामक मालमत्ताधारकाने उत्तरही दिले नाही. या मालमत्तेचा लिलाव झाल्यानंतरही अद्याप जुन्या मालमत्ताधारकास कुठलीही माहिती नाही. असाच एक प्रकार हनुमाननगर झोनमध्ये घडला. मालमत्ताधारकाने मालत्तेचे म्युटेशन न केल्याने मालत्ताप्रकरणी जुन्या लेआऊधारकास नोटीस पाठविली गेली. ती नाकारण्यात आल्यानंतर मनपातर्फे मालमतेबाबत सूचना प्रसिद्ध केली. मात्र, त्यानंतरही कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्या मालमत्तेचाही लिलाव करण्यात आला. आता या मालमत्ताधारकाने त्याच्या मालमत्तेचा लिलाव झाल्याचे कळल्यानंतर न्यायालयात धाव घेतली. परंतु, मनपाने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यावर लिलाव प्रक्रिया पूर्ण केली.