आमटे कुटुंबीयांनी फेटाळले शीतल आमटेंचे आरोप

November 25,2020

गडचिरोली : २५ नोव्हेंबर - महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास व सहसचिव डॉ. प्रकाश आमटे यांनी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी समाजमाध्यमांवर केलेले आरोप फेटाळले आहेत. डॉ. आमटे-करजगी यांनी आनंदवनातील कार्यकर्ते व आमटे कुटुंबातील व्यक्तींवर केलेल्या आरोपाशी अजिबात सहमत नसल्याचे स्पष्टीकरण आमटे कुटुंबीयांतर्फे समाजमाध्यमांवर जारी केलेल्या निवेदनातून देण्यात आले आहे.

कर्मयोगी बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले आनंदवन म्हणजे माणुसकीला लागलेली शारीरिक व मानसिक अस्पृश्यतेची जखम धुऊन काढणारी गंगोत्रीच. कुष्ठरोग्यांना आत्मनिर्भर करण्यात मोलाचे पाऊल उचलणाऱ्या या संस्थेला अलीकडच्या काही महिन्यांत वादाचे ग्रहण लागले आहे. कार्यकर्त्यांचा छळ, त्यांच्यावर केली जात असलेली मनमानी, आमटे कुटुंबातील वाद यावर ‘लोकसत्ता’ने काही महिन्यांपूर्वी प्रकाश टाकला होता. त्यानंतर डॉ. प्रकाश आमटे यांनी आनंदवनातील सर्व वादांवर तोडगा काढला जाईल, अशी भूमिका ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडली होती. या पार्श्वभूमीवर ही नवी घडामोड आता समोर आली आहे.  डॉ. विकास आमटे यांच्या कन्या  व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल  आमटे-करजगी यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक चित्रफीत जारी केली. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. ही चित्रफीत नंतर दोन तासांतच माध्यमातून हटवण्यात आली. त्यात करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले आहे. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल (पूर्वाश्रमीच्या डॉ. शीतल विकास आमटे) या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली आहे. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीतसुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. डॉ. शीतल यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे निवेदन देण्यात येत असल्याचे या चौघांनी म्हटले आहे. लोकाश्रयावर विकसित झालेल्या या संस्थेचे काम यापुढेही आमटे कुटुंबातर्फे एकदिलाने चालवले जाईल. तसेच संस्थेने घेतलेल्या नैतिक भूमिकांशी व ध्येयाशी आम्ही प्रामाणिक राहू, असा विश्वास यातून व्यक्त करण्यात आला आहे. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती यातून करण्यात आली आहे. या निवेदनामुळे आमटे कुटुंबातील मतभेद पुन्हा चव्हाटय़ावर आले असून संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने केलेले आरोप फेटाळण्याची वेळ आमटे कुटुंबावर आली आहे.

महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त मंडळातून काही वर्षांपूर्वी काढून टाकण्यात आलेल्या कौस्तुभ आमटे यांना पुन्हा मंडळात स्थान देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मंडळाच्या सर्व सदस्यांची ऑनलाइन सभा झाली. त्यात १४ विरुद्ध २ मतांनी कौस्तुभ यांना विश्वस्त करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. डॉ. शीतल व त्यांचे पती गौतम यांनी विरोधात मत नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली. तेव्हापासूनच अस्वस्थ असलेल्या शीतल यांनी हे आरोप केले असावेत, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यावर आमटे कुटुंबातील कुणीही अधिकृतपणे बोलायला तयार नाहीत.