शवविच्छेदनगृहातून महिलेच्या अंगावरील दागिने केले लंपास

November 25,2020

नागपूर: २५ नोव्हेंबर - शवविच्छेदनगृहातून मृत महिलेच्या अंगावरील दागिने लंपास करण्यात आले. मृतकाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा धक्कादायक प्रकार मेयो हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी तहसील पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका परिचारिकेवर पोलिसांचा संशय आहे. लवकरच तिला चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती तहसील पोलिसांनी दिली. 

सागर ज्ञानेश्वर बागडकर (वय ३२ रा. वॉर्ड क्रमांक दोन खापरखेडा) यांच्या आई पुष्पा बागडकर वय ५५ यांची ऑक्टोबर महिन्यात प्रकृती खालावली. सागर यांनी पुष्पा यांना मेयो हॉस्पिटलमधील वॉर्ड क्रमांक ४१मध्ये दाखल केले. उपचारावेळी पुष्पा यांच्या बोटात अंगठी, गळ्यात सोन्याच्या डोरल्यासह ३५ हजार रुपये किमतीचे दागिने होते. १६ ऑक्टोबरला उपचारादरम्यान पुष्पा यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी त्यांच्या मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला. यादरम्यान अज्ञात चोरट्याने मृतदेहाच्या अंगावरील दागिने चोरी केले. ही बाब सागर यांच्या लक्षात आली. त्यांनी तहसील पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी करून चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मेयो हॉस्पिटल प्रशासनाला सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. मात्र अद्यापही पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले नाही. सागर यांनी एका परिचारिकेवर संशय व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेच्या तपासणीनंतर तसेच परिचारिकेच्या चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल,अशी माहिती तहसील पोलिसांनी दिली.

ऑक्टोबर महिन्यात मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या दोन रूग्णांचे मोबाइलही चोरी गेल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही प्रकरणी तहसील पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचाही आता नव्याने तपास करण्यात येणार आहे.