लालूप्रसाद यादव नितीशकुमार सरकार पडण्याचा प्रयत्न करीत आहेत - सुशीलकुमार मोदी यांचा आरोप

November 25,2020

पाटणा : २५ नोव्हेंबर - बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-जदयू प्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकारही स्थापन झालेलं असताना बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. लालू प्रसाद यादव हे तुरूंगातून नितीश कुमार यांचं सरकार पाडण्याचा कट रचत आहे, असा आरोप मोदी यांनी केला आहे.

बिहारमध्ये एनडीएनं सरकार स्थापन केलं आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ दिवस होत नाही तोच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न लालू प्रसाद यादव यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप भाजपानं केला आहे.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी एक ट्विट करत बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. “लालू प्रसाद यादव रांचीतील तुरूंगात बसून एनडीएच्या आमदारांना कॉल करून मंत्रीपदाच आश्वासन देत आहेत. जेव्हा मी कॉल केला तेव्हा तो कॉल थेट लालू प्रसाद यादव यांनी उचलला होता. तुरूंगात बसून अशा घाणेरड्या चाली खेळू नका. तुम्हाला यात यश मिळणार नाही, असं मी त्यांना सांगितलं,” असा दावा सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.

मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांनी एनडीए आमदारांना केलेल्या कॉलची ऑडिओ रेकॉर्डिंगही ट्विट केली आहे. ज्यात लालू प्रसाद यादव सभापती निवडणुकीत एनडीएच्या आमदारांना पाठिंबा देण्याचं सांगत आहेत. करोना झाल्याचं सांगून गैरहजर राहावं, असा सल्ला लालू प्रसाद यादव आमदारांना देताना दिसत आहेत.