ठाणे महापालिका हे भ्रष्टाचाराचे विद्यापीठ - निलेश राणे

November 25,2020

मुंबई : २५ नोव्हेंबर - ठाण्यातील शिवसेनेच्या राजकीय नेत्यांच्या उद्योगधंद्यांबद्दल मला बरीच माहिती आहे. ठाणे महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचे विद्यापीठ आहे. बिल्डिंग किंवा बांधकाम व्यवसायाशी निगडीत अनेक गैरव्यवहार ठाणे जिल्हय़ात आणि शहरात चालतात. ठाण्यातील शिवसेनेच सर्व नेते ज्या प्रकारचा कारभार करतात, त्यावरून ठाण्यात भ्रष्टाचार उघड आहे हे ठाणेकरांनाही माहिती आहे. बांधकाम व्यवसाय किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये ठाण्याचे शिवसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांचे बरेच आर्थिक गैरव्यवहार आणि काळे धंदे आहेत, असा दावा नीलेश राणे यांनी केला.

ईडी ही सरकारची एजन्सी आहे. त्यांना काहीतरी माहिती मिळाली असेल म्हणूनच ही कारवाई केली जात आहे. जर प्रतार सरनाईक यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या नसतील तर त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. सरकारची एजन्सी कोणाला तरी काहीतरी वाटते म्हणून काम करत नाही. त्यांच्याकडे काही माहिती आली असेल किंवा तक्रार आली असेल, म्हणून ही कारवाई केली जात असणार, असे मत त्यांनी व्यक्त केले.