विवाहितेला जिवंत पेटविणाऱ्या पतीला जन्मठेप

November 25,2020

औरंगाबाद : २५ नोव्हेंबर - हुंड्यासाठी विवाहितेला वारंवार मारहाण करुन जिवंत पेटवून देत तिचा खून करणार्या पतीला जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्याचे आदेश प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. टेकाळे यांनी दिले. अशोक अण्णा मोरे असे नराधम पतीचे नाव आहे.

या प्रकरणात मृत मनीषा अशोक मोरे (२५) हिने फिर्याद दिली होती. २0१२मध्ये मनीषाचे लग्न आरोपी अशोक मोरे याच्याशी झाले होते. त्यांना दोन मुली आहेत. लग्नानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर नवरा आणि सासू नर्मदाबाई मोरे (६0) यांनी मनीषाला लग्नात हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून वारंवार शिवीगाळ व मारहाण करून छळ करीत होते. २४ जानेवारी २0१६ रोजी याचा कारणावरून मनीषाला बेदम मारहाण करण्यात आली. दुसर्या दिवशी आरोपी अशोक हा सायंकाळी दारू पिऊन आला. त्यामुळे मनीषाने त्याला दारू पिण्याचा जाब विचारला. त्यामुळे चिडलेल्या अशोकने मनीषाला शिवीगाळ, मारहाण करीत घरातील रॉकेलने भरलेली कॅन तिच्या अंगावर ओतून पेटवून दिले. मनीषाने आरडाओरडा केल्याने आरोपीने तिच्या अंगावर वाळू टाकून आग विझविली. मनीषाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना २६ जानेवारी २0१६ रोजी पोलिस आणि नायब तहसीलदारांनी मनीषाचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविला. त्यानुसार, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात ३0७, ४९८ (अ) व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.