आमच्याच मित्राने आमच्याशी बेईमानी केली - देवेंद्र फडणवीसांचा आरोप

November 25,2020

सोलापूर : २५ नोव्हेंबर - राज्यात तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेली महाविकास आघाडी अभद्र आणि अनैसर्गिक आहे. आमच्याच मित्राने बेईमानी केली, सत्तेसाठी असंगाशी संग केला, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  शिवसेना आणि दोन्ही कॉंगे्रसवर जोरदार हल्ला चढविला. ही अभद्र आघाडी ज्या दिवशी संपुष्टात येईल, त्यानंतर लगेच भाजपा राज्याला मजबूत सरकार देणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

सोलापूरच्या भेटीवर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अनैसर्गिक आघाडी झाली की काय होते ते सोलापुरात पाहायला मिळाले. नेत्यांचे छायाचित्र टाकले नाही म्हणून येथे हाणामारी झाली, असा टोला त्यांनी हाणला.

आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही. हे सरकार लवकरच कोसळणार आहे, याची आम्हाला माहिती आहे आणि तोपर्यंत आम्ही प्रभावी विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडणार आहोत, असे त्यांनी सांगितले. आम्ही सातत्याने सरकारचे लक्ष वेधण्याचे काम करीत आहोत. आपल्या शब्दावरून रोज फिरणारे हे सरकार आहे. शेतकर्यांना मदत करतो म्हणाले; मात्र अजून अनेकांना मदत मिळाली नाही, कोरोनाच्या संकटकाळात एकाही घटकला मदत केली नाही. आपल्यापेक्षा छोट्या राज्यांनी गरीबांना मदत केली, असे ते म्हणाले.

राज्यात सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. कोरोना काळात जिथे निवडणुका झाल्या, तिथे आम्ही जिंकलो. जनतेला कर्मयोगी आवडतात, बोलघेवडे नाही. आपल्याकडील बोलघेवडे विजेच्या देयकांबाबत बोलतात एक आणि करतात एक, असा टोला त्यांनी लगावला. तीन मंत्री घोषणा करतात, त्यानंतर आपले ऊर्जामंत्री म्हणतात की, वापरलेल्या विजेचे देयक द्यावेच लागेल. हे काम गोंधळलेले सरकारच करू शकते, असा चिमटा त्यांनी काढला.

बिहारमध्ये सत्ताधार्यांविरोधात लाट असल्याने रालोआचा पराभव होईल, नितीशकुमारांना निरोप द्यायची वेळ आलेली आहे, असे मोठमोठे दावे केले जात होते. मी त्यावेळी बिहारमध्येच होतो. लोक मला सांगायचे की, उमेदवाराशी आम्हाला काहीच घेणेदेणे नाही, आम्ही मोदींना बघून मत देत आहोत. केंद्र सरकारने संकटकाळात आम्हाला जगविले. यामुळेच बिहारमध्ये रालोआचा विजय झाला, असे फडणवीस म्हणाले.