ट्रॅव्हल्स बस मधून सोन्या-चांदीचे दागिने पळविले

November 25,2020

वर्धा : २५ नोव्हेंबर - समुद्रपूर- गडचांदूरवरून नागपुरला जात असलेल्या महाराजा टॅव्हल्स मधील प्रवाशाच्या बॅग मधील सोन्याचांदीचे दागिने असलेली छोटी बॅग चोरट्यानी पळविली. बॅगमध्ये अडीच लाखाचा मुद्देमाल होता. ही घटना सकाळी ९ वाजताचे दरम्यान जाम चौरस्त्यावरील हॉटेल अशोकासमोर उघडकीस आली.

नागपूर येथील शिक्षिका संगीता दुबे या दिवाळीनिमित्य गडचांदुर येथील रुद्रप्रताप मिर्शा यांचेकडे माहेरी आली होती. दिवाळी संपल्याने पती विश्वेश दुबे सह काल सकाळी ६. ३0 दरम्यान गडचांदुर वरून महाराज टॅव्हल्सने नागपुरसाठी निघाले. यावेळी ते सीट क्रमांक ११ व १२ वर बसले होते. त्यांनी आपल्या जवळील एक बॅग डिक्कीमध्ये टाकली होती. ज्यामध्ये सोन्या चांदीची छोटी बॅग ठेवली होती. ती बॅग आपल्या सिटच्या खाली पायाजवळ ठेवली होती. सकाळी टॅव्हल्स जाम येथे आल्यानंतर अशोका हॉटेलच्या समोर असलेल्या पार्कीगमध्ये बस उभी राहली. तेव्हा इतर प्रवाशासहीत संगीता दुबे पण पतीसह लंघुशकेकरीता उतरली. याच कालावधी मध्ये अज्ञात चोरट्यांनी सदर बॅग खोलुन बॅगमधील सोन्या,चांदीचे दागिने असलेली छोटी बॅग काढून दागिने लंपास केले.